लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेले नागरिक पुन्हा माघारी; पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 13:36 IST2021-08-15T12:59:12+5:302021-08-15T13:36:56+5:30
लागोपाठ तीन दिवस सुट्टी असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत

लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेले नागरिक पुन्हा माघारी; पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात
पुणे : लोणावळ्यात टायगर पॉईंट व लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई, पुणे तसेच अनेक जिल्हयातून आलेल्या पर्यटकांना लोणावळा शहर पोलीस पुन्हा माघारी पाठवत आहेत. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी जमावबंदी आणि पर्यटनस्थळ बंदी आदेश असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाराष्ट्रात १५ आँगस्टपासून नविन नियमावलीनुसार अनलाॅक केले जात असताना लोणावळा शहरातील पर्यटनस्थळ बंदी मात्र कायम आहे. पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी व जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या याचा विचार करून निर्णय घेण्यात येईल मात्र तुर्तास पर्यटनस्थळ बंदीचे जुनेच आदेश लागू असतील अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिली.
पर्यटनस्थळे ही बंदच राहणार
शनिवार रविवारच्या सुट्टीला जोडून सोमवारी पतेतीची सुट्टी आल्याने पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा खंडाळा व कार्ला परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी असती तरी लोणावळा व परिसरातील हाॅटेलमध्ये येण्यास पर्यटकांना परवानगी असल्याने पर्यटकांनी लोणावळ्यात यावे, येथील अल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले आहे. याच नुसार येथील हाॅटेल, रिसाॅर्ट, खाजगी बंगले, फार्म हाऊन आरक्षित होऊ लागले आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागू लागल्या असून रेस्टाॅरंट देखील भरू लागली आहेत. याविषयी बोलताना मुख्याधिकारी सोमनाथ जाधव म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार आजपासून शहरातील दुकाने रात्री दहा वाजेपर्यत खुली राहणार आहेत. मात्र पर्यटनस्थळे ही बंदच राहणार आहेत.
पर्यटनस्थळ बंदी आदेश लागू असल्याने सकाळपासूनच भुशी धरण, लायन्स पाॅईट, शिवलिंग पाॅईटकडे जाणार्या मार्गावर लोणावळा शहर पोलीस चेकपोस्ट लावत विनाकारण फिरणार्यांना माघारी पाठविले तसेच पर्यटनस्थळांकडे जाणार्या पर्यटकांना रोखले. ग्रामीण पोलिसांनी देखील कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला व पवना धरणाकडे जाणार्या मार्गावर चेकपोस्ट लावले होते.
पर्यटनस्थळ बंदी विषयी बोलताना जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, पर्यटनस्थळे खुली असताना त्याठिकाणी होणारी गर्दी सर्वश्रूत आहे. याकरिता जिल्ह्याच्या बैठकीत यासर्व बाबींचा विचार करून तसेच जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या याच्यावर विचार विनिमय करून निर्णय घेतला जाईल. तुर्तास बंदी कायम असून पर्यटकांनी त्याचे पालन करावे.