Corona News: पुण्यात बूस्टर डाेसकडे नागरिकांची पाठ; केवळ १५ टक्के नागरिकांना तिसरा डोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 14:53 IST2022-12-25T14:53:32+5:302022-12-25T14:53:41+5:30
भारतात संभाव्य धोका टाळण्यासाठी बूस्टर डोसचे लसीकरण तातडीने करून घ्यावे

Corona News: पुण्यात बूस्टर डाेसकडे नागरिकांची पाठ; केवळ १५ टक्के नागरिकांना तिसरा डोस
पुणे : पुणे शहरात केवळ १५ टक्के नागरिकांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या जास्त असून, ती ९४ टक्के आहे. यावरून तिसऱ्या डाेसकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
चीनसह ब्राझील, अमेरिका, आदी देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. भारतात संभाव्य धोका टाळण्यासाठी बूस्टर डोसचे लसीकरण तातडीने करून घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा आणि महापालिका स्तरावर बूस्टर डोस घेतले नसलेल्यांना लसीकरणाबाबत जागरूक करण्यास सांगण्यात आले आहे.
महापालिकेकडे याबाबत माहिती घेतली असता कोविशिल्ड आणि कॉर्बेव्हॅक्सचा साठाच उपलब्ध नाही. शहरातील २० लसीकरण केंद्रांवर फक्त कोव्हॅक्सिनची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविशिल्ड उपलब्ध नसल्याने नागरिक बूस्टर डोसकडे पाठ फिरवत आहेत, असेही दिसून आले आहे.
दरम्यान, शहरात १२ ते १४ वर्षे वयोगटांतील १ लाख ४ हजार ५७२ लाभार्थी आहेत. त्यापैकी ४३ हजार ९२९ जणांचा अर्थात ४१ टक्के मुलांचा पहिला डोस घेऊन झाला आहे, तर २९ हजार ९२ जणांनी २७ टक्के डोस घेतला आहे. सध्या कॉर्बव्हॅक्सचा साठा उपलब्ध नसल्याने १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण बंद आहे. यामुळे पुन्हा लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हाेत आहे.