पुणे : दस्त नोंदणी केलेल्या नव्या व जुन्या मालमत्तेवरील कर व पाणीपट्टी आता थेट खरेदीदाराच्या नावावर करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली योजना अखेरीस पुण्यातही सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाच महिन्यांपूर्वीच सुरू केलेली ही सुविधा पुणे महापालिकेच्या संकेतस्थळात असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे आता सुरू झाली आहे. त्यासाठी आता महापालिकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून ही सुविधा आता दस्तनोंदणीवेळीच उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील १४ महापालिकांसह ३८३ नगरपालिकांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रॉपर्टी कार्डावरील युनिक आयडी क्रमांकावरून थेट तुमचे नाव महापालिकेच्या दप्तरी लावण्यात येणार आहे.महापालिका हद्दीतील कोणतेही नवे किंवा जुने घर, फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्यावरील मालमत्ताकर, पाणीपट्टी बिल आपल्याला स्वत:च्या नावावर करण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र अर्ज द्यावा लागतो. त्यासाठी वेळेची मर्यादा नसल्याने सरकारी पद्धतीने तुम्हाला हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता दस्तनोंदणी करतानाच ‘आय सरिता’ या प्रणालीचे एकत्रीकरण केले आहे. त्यामुळे दस्तनोंदणी करतानाचा संबंधित मालमत्तेचा युनिक आयडी अर्थात इपिक क्रमांक (सोप्या भाषेत आधार क्रमांक) दस्तनोंदणी वेळेस नमूद करावा लागणार आहे; तसेच जुनी मालमत्ता असल्यास मिळकतकर क्रमांक टाकावा लागणार आहे. नव्या मालमत्तेसाठी याची गरज राहणार नाही. दस्तनोंदणी झाल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही माहिती महापालिकेला ऑनलाइन दिल्यानंतर त्यांच्याकडील प्रणालीद्वारे खरेदी केलेली मालमत्ता थेट नावावर नोंदली जाइल व मालमत्ता कर व पाणीपट्टीही नावावर दिसू लागेल.थकबाकीचीही माहिती कळणारजुनी मालमत्ता खरेदी करताना पब्लिक डेटा एन्ट्रीतून खरेदीदार व विक्री करणाऱ्याची माहिती भरली जाते. त्यात महापालिकेचा कर क्रमांक भरला जातो. माहिती भरताना या क्रमांकावर थकबाकी असल्यास तेही या माध्यमातून कळणार आहे.
महापालिकेसोबत ‘आय सरिता’चे एकत्रीकरण केले आहे. राज्यातील ३८३ नगरपालिका क्षेत्रातही ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. - अभयसिंह मोहिते, उपनोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक शुल्क विभाग, पुणे