पुणे : शहरात सायबर चोरांमुळे दररोज सर्वसामान्य पुणेकरांचे कोट्यवधी रुपये लुटले जात आहेत. मुळात किरकोळ आमिषाला भुलून नागरिक सायबर चोरांकडे स्वत:हून पैसे देत असून, नंतर त्यांची फसवणूक होत आहे. दररोज, यासंबंधीच्या घटना घडत असल्याने पोलिसांपुढे देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशाच दोन घटनांमध्ये सायबर चोरांनी दोघांना ६० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी बाणेर आणि काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत पॅनकार्ड क्लब रोडवरील ४७ वर्षीय इसमाला सायबर चोरांनी ट्रेडिंग कंपनीमध्ये डिस्काऊंट शेअर व आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत फिर्यादीने ४० लाख ९८ हजार रुपये गुंतवले, यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. हा प्रकार १२ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत घडला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप करत आहेत.
दुसऱ्या घटनेत मोहंम्मदवाडी येथील ३५ वर्षीय इसमाला देखील अशाच पद्धतीने सायबर चोरांनी शेअर्स व आयपीओच्या नावाने पैसे गुंतवल्यास नफा देण्याचे आमिष दाखवले, यावर विश्वास ठेवून फिर्यादीने १९ लाख २ हजार रुपये गुंतवल्यानंर, त्याला कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.