स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती आडवी येत नाही : बिरदेव डोणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 20:15 IST2025-05-10T20:14:45+5:302025-05-10T20:15:06+5:30
नुकत्याच पार पडलेल्या युपीएससी परीक्षेत बिरदेव डोणे यांनी ५५१ वा रॅंक मिळवत यश मिळविले.

स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती आडवी येत नाही : बिरदेव डोणे
बारामती : कष्ट, मनाची तयारी असलेल्या कोणत्याही युवकाला स्वप्न पूर्ण करताना त्याची परिस्थिती आडवी येत नाही. माझे कुटुंबीय मेंढपाळ असताना देखील मला यूपीएससी परीक्षेत यश मिळवणे शक्य झाले. मी करू शकतो, तर या देशातला प्रत्येक तरुण का करू शकत नाही, असा आशावाद बिरदेव डोणे यांनी व्यक्त केला.
नुकत्याच पार पडलेल्या युपीएससी परीक्षेत बिरदेव डोणे यांनी ५५१ वा रॅंक मिळवत यश मिळविले. मेंढपाळाचा मुलगा अशी ओळख असलेल्या डोणे यांचे सर्वत्र काैतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर डोणे यांचा भारताच्या बेसबॉल महिला संघाच्या कॅप्टन रेश्मा पुणेकर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते बारामतीत सत्कार करण्यात आला. तसेच, यावेळी डोणे यांचे युवा वर्गासाठी प्रेरक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डोणे यांनी युवकांशी संवाद साधला.
यावेळी डोणे म्हणाले, आपण विविध परीक्षा देताना आपल्या कुटुंबातील पालक आपल्या यशाकडे डोळे लावून बसलेले असतात. अनेक पालक सर्वसामान्य कुटुंबातून असतात, त्यांना यूपीएससी परीक्षा कशी होत असते याबद्दल कोणतीच माहिती नसते. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण यूपीएससी एमपीएससीसारखी परीक्षा क्रॅक करू शकतो का नाही, हे माहीत असते. मेरिटपासून ५० ते ६० गुणांचा फरक असल्यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थी पुण्यासारख्या शहरातून बाहेर पडत नाहीत.
अप्रत्यक्षरीत्या ते आपल्या कुटुंबीयांना पालकांना फसवतात, याचे दुःख वाटते. त्यामुळे यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणे वाईट किंवा चुकीचे नाही, प्रयत्न केलाच पाहिजे. परंतु, यातून योग्य वेळी बाहेर देखील पडता आले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यास करताना पाठबळ देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी स्थानिक संयोजकांकडून बिरदेव ढोणे यांच्या ग्रंथालयासाठी २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली, तसेच त्यांना पुस्तकाचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.