मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही - नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 17:10 IST2023-02-05T17:09:33+5:302023-02-05T17:10:28+5:30
सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही, मुख्यमंत्र्यांच्या फोनवर नाना पटोले यांचे उत्तर

मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही - नाना पटोले
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी भाजपने टिळक परिवाराला दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोटनिवडणुक बिनविरोधसाठी जो प्रस्तावाला दिला होता त्याला आता अर्थ राहिला नाही. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
पुण्यातील कॉग्रेस भवनात ते पत्रकाराशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून ही निवडणूक बिनविरोध केली जावी याकरिता आलेल्या फोनबद्दल बोलताना पटोले म्हणाले की, त्यांना आपण यावर बसून चर्चा करू असे सांगितलं. मात्र भाजपकडून या निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली, ती टिळक परिवाराला देण्यात आली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिला होता तो जो प्रस्तावाला आता अर्थ राहिला नाही. सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही. सत्तेत आल्यापासून तुम्ही आमची कामं थांबवली आहेत. यापूर्वी अशी कामं थांबवली गेली नव्हती, असं मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं ते म्हणाले.
मुक्ता टिळक जेव्हा आजारी होत्या तेव्हा विधानसभेत भाजपला जेव्हा गरज पडायची तेव्हा त्यांना स्ट्रेचरवर उचलून आणलं जायचं.त्यांनी शेवटपर्यंत भाजपसाठी काम केलं. त्यांच्या कुटुंबाला तिकीट मिळेल असं वाटतं होतं. ते मिळालं नाही. हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. वंचितचा आमच्याकडे किंवा आमचा वंचितला कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे यावर चर्चा करणे योग्य नाही. असेही त्यांनी सांगतिले.
सोमवारी अर्ज दाखल करणार
कसब्याच्या उमेदवारीबाबत आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचं नावं निश्चित होईल. काँग्रेसकडून सोमवारी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझ बोलणं झालं आहे. आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत असेही नाना पटोले यांनी सांगितले.
देशभरात मोठे आंदोलन
अदानी कंपनीने बँका , एलआयसीच्या माध्यमातून खोटे कागद दाखवून कर्ज घेतलं आहे. त्याबद्दल लोकसभेत चर्चा व्हावी अशी मागणी केली जातेय. जॉइंट पार्लमेंट कमिटी स्थापन करण्याची मागणी कॉंग्रेसकडून केली जातेय. त्याला भाजप विरोध करत आहे. त्यामुळे देशभरात कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यात होणाऱ्या आंदोलनात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील. सर्वसामान्य लोकांचा बँकेत ठेवलेला पैसा सुरक्षित राहिला नाही.सरकार याविषयी काही बोलत नाही.त्यामुळे जनतेची लढाई आम्ही रस्त्यावर करणार आहोत असे नाना पटोले यांनी सांगितले.