मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जैन बोर्डिंगला भेट देऊन हा व्यवहार रद्द करावा; जैनमुनींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:49 IST2025-10-30T10:48:30+5:302025-10-30T10:49:15+5:30
जर एका दिवसात व्यवहार होऊ शकतो आणि त्यासाठी कर्जही मिळू शकते, तर तोच व्यवहार एका दिवसात रद्द का होऊ शकत नाही का? जैन मुनींचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जैन बोर्डिंगला भेट देऊन हा व्यवहार रद्द करावा; जैनमुनींची मागणी
पुणे : मुख्यमंत्र्यांनी स्वतः शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगला (जैन बोर्डिंग) भेट देऊन जागेचा व्यवहार रद्द करावा आणि आपण जैन समाजासोबत असल्याचे दाखवून द्यावे, तसेच अशा प्रकारचे व्यवहार होऊ नये यासाठी सरकारने कायदा तयार करावा, अशी मागणी आचार्य श्री गुप्तीनंदीजी महाराज यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी जैन बोर्डिंग जागेच्या विक्रीचा व्यवहार जोपर्यंत पूर्णपणे रद्द होत नाही आणि सरकारकडून त्याबाबतचा अधिकृत लेखी आदेश येत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला.
आचार्य गुप्तीनंदीजी महाराज म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजासोबत असल्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री कधी असत्य बोलत नाहीत, याचा आम्हाला विश्वास आहे. जर एका दिवसात व्यवहार होऊ शकतो आणि त्यासाठी कर्जही मिळू शकते, तर तोच व्यवहार एका दिवसात रद्द का होऊ शकत नाही? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार काढून घेत समाजाच्या मालकीचे मंदिर विकले गेले, या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरू असल्याचे फळ काही प्रमाणात आता दिसू लागले आहे. विक्री व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांनी प्रथम आठ दिवसांची स्थगिती दिली. त्यानंतर बिल्डरने व्यवहार रद्द करत असल्याचे कळविल्यानंतर आता विश्वस्तांनीही व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र दिले आहे. मात्र, धर्मादाय आयुक्तांनी अद्याप तो निर्णय स्वीकृत केलेला नाही. त्यामुळे आम्ही अजून समाधानी नाही. जेव्हा व्यवहार रद्द होईल तेव्हाच आंदोलन थांबविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या जागा विक्री व्यवहाराविरोधात देशभरात एक दिवस उपवास करण्यात आला. माझ्यासाठी हा उपवास ठेवण्यात आल्याने मीही त्यात सहभागी झालो आहे. उद्या होणारी सुनावणी समाजाच्या बाजूने व्हावी यासाठी देशभरातील जैन संतांनी उपवास केला आहे, तसेच जैन बोर्डिंग बचाव समितीच्या पुढाकाराने उद्यापासून ‘जैन बोर्डिंग बचाव व्याख्यानमाला’ सुरू होत आहे. या व्याख्यानमालेत पुढील आठ दिवस देशभरातील जैन समाजाचे विविध ट्रस्ट कसे वाचवता येतील, याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचेही महाराजांनी सांगितले.