स्वारगेट प्रकरणातील आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार; आयुक्तांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:44 IST2025-03-05T12:40:17+5:302025-03-05T12:44:40+5:30
स्वारगेट प्रकरणात बसच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या प्रवाशांची ओळख पटवून त्यांचाही जबाब घेतला जाणार

स्वारगेट प्रकरणातील आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार; आयुक्तांचे स्पष्टीकरण
पुणे: स्वारगेट एसटी स्थानक बलात्कार प्रकरणी पंधरा दिवसांत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले आहेत. पोलिसांनी आरोपीला गुनाट गावातून अटक केल्यावर आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याविषयी सांगताना आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. आम्हाला ठोस पुरावे मिळाले आहेत. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून दोषारोपपत्र १५ दिवसांत दाखल करण्यात येणार आहे.
पीडितेच्या आईसह बसवाहक व कॅब चालकाचा जबाब
दरम्यान, गुन्हे शाखेने पीडितेच्या आईसह ज्या बसमध्ये अत्याचार घडला त्याच्या वाहकाचा जबाब नोंदवला. स्थानकात उभ्या असलेल्या बसचा ताबा वाहकाकडे असतो, यामुळे त्याने बस का उघडी ठेवली याची विचारणा करण्यात आली आहे. याबरोबरच पीडित ज्या कॅबने स्थानकात आली, त्या कॅब चालकाचाही जबाब घेण्यात येत आहे. यानंतर बसच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या प्रवाशांची ओळख पटवून त्यांचाही जबाब घेतला जाणार आहे. आरोपीची डीएनए प्रोफायलिंग करणार असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.