निवडणुका लक्षात घेऊन मंजूर निधी वेळेत खर्च करा : चंद्रकांत पाटील

By नितीन चौधरी | Updated: October 15, 2022 18:16 IST2022-10-15T18:13:32+5:302022-10-15T18:16:32+5:30

पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते...

Chandrakant Patil said Spend the sanctioned funds in time keeping in mind the elections | निवडणुका लक्षात घेऊन मंजूर निधी वेळेत खर्च करा : चंद्रकांत पाटील

निवडणुका लक्षात घेऊन मंजूर निधी वेळेत खर्च करा : चंद्रकांत पाटील

पुणे : “जिल्ह्यातील विकासकामे वेगाने मार्गी लावायची असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मंजूर निधी वेळेत खर्च होईल याचे नियोजन करण्यात यावे. अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासकीय निधीसोबतच उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही सहकार्य घेण्यात येईल,” अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उप वनसंरक्षक राहुल पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, “जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी निवडक स्थळ घेऊन तेथील विकासाचे नियोजन करावे, जेणेकरून अशा ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू शकेल. आगामी काळातील रोजगार कौशल्याधारित असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात यावा. त्यासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात येईल. शिरूर परिसरात बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीती असल्याने बिबट्या पकडण्यासाठी अधिकचे पिंजरे लावावेत आणि तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक नियोजन करावे.”

यावेळी त्यांच्या हस्ते समाज कल्याण विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या सेवा पंधरवडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी देशमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा सादर केला.

Web Title: Chandrakant Patil said Spend the sanctioned funds in time keeping in mind the elections