पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलन पुण्यात गांधी भवनमध्ये ७, ८ व ९ मार्च रोजी होत आहे. ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवर संमेलनाचे अध्यक्ष असून राज्यसभेचे खासदार मनोज कुमार झा उद्घाटक आहेत. पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या हस्ते संमेलनाचा समारोप होईल. त्यानिमित्त आयोजक व गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याबरोबर झालेली बातचीत.
प्रश्न : महात्मा गांधी व त्यांचे विचार आता ‘आउटडेटेड’ झालेत असे बोलले जात असल्याच्या काळात गांधी विचार साहित्य संमेलन भरवण्याचे कारण काय?
डॉ. सप्तर्षी : तेच तर कारण आहे. महात्मा गांधी शरीराने गेले, नव्हे त्यांना घालवण्यात आले, मात्र त्यांचा विचार आजही आहे, याचा अर्थ तो विचार मारता आलेला नाही. जगातील ८० पेक्षा जास्त देशात गांधींजींचे पुतळे आहेत, देशीविदेशी भाषेतील त्यांच्यावरील पुस्तकांची संख्या लाखापेक्षा जास्त आहे. जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्यचळवळीचे प्रणेते गांधीजी आहेत. देशात आजही सत्ताधारी असोत किंवा विरोधक, महात्मा गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. हे सगळे महात्मा गांधी व त्यांचे विचार ‘आउटडेटेड’ झाल्याचे चिन्ह आहे का? विद्यमान सत्ताधारी किंवा त्यांचे प्रायोजक असलेले तरी महात्मा गांधींना उघडपणे नाकारू शकतील काय? या विचारांची नव्याने उजळणी व्हावी, नव्या पिढीलाही गांधी काय होते ते कळावे यासाठी हे संमेलन आहे.
-- नव्या पिढीला याचे आकर्षण वाटेल?
-- का नाही वाटणार? त्यांच्या भाषेत सांगितले तर नक्की वाटेल. म्हणजे महात्मा गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात एका मोठ्या प्रोजेक्टवर काम केले. विविध धर्म, पंथ, जात, वेगवेगळी संस्थाने यात विखुरलेल्या ३३ कोटी जनतेला एकत्र करून पारतंत्र्यांच्या विरोधात उभे केले. शस्त्राविना लढा दिला. हा प्रोजेक्ट त्यांनी यशस्वी करून दाखवला. ही एक विलक्षण गोष्ट आहे. जगभरातील अनेक विचारवंत, नेते, शास्त्रज्ञ, उद्योगपती यांना याचे आश्चर्य आहे. विदेशातील व्यवस्थापन शास्त्रात, आरोग्यशास्त्रात, पर्यावरण संवर्धनात, स्वयंरोजगारात अशा अनेक क्षेत्रात गांधीजींचे विचार अभ्यासले जातात, ते त्यांनी त्या क्षेत्रात मिळवलेल्या यशामुळेच. हे सगळे नव्या पिढीसमोर यायला हवे हाच आमचा उद्देश आहे. संमेलनाचे आयोजन त्यासाठीच आहे.
-- तीन दिवसांच्या संमेलनातून हे साध्य होईल असे वाटते?
-- आम्ही हे संमेलन एक मॉडेल म्हणून करत आहोत. काय अडचणी येतील त्या आम्ही सोडवत आहोत, त्यातून मार्ग कसा निघाला याची नोंद करतो आहोत. हेच मॉडेल नंतर प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवले जावे असे आम्हाला अपेक्षित आहे. नव्हे, तसेच व्हावे असा आमचा प्रयत्न आहे. विषय हवा? आम्ही देऊ! वक्ते हवे? आम्ही देऊ! आर्थिक मदत हवी? आम्ही ती कशी मिळवली ते सांगू! यातून एक वातावरण व्हावे, तुम्ही सुरुवातीला जो उल्लेख केला की, गांधी विचार आउटडेटेड झाला आहे, याला यातून उत्तर मिळावे. आजही या देशात गांधीच मोठे आहेत. ते म्हणजे भारतीय संस्कृतीचा अर्क आहेत. त्यांच्यावर टीका झाली, त्यांना काय काय ठरवले गेले, अजूनही ठरवले जाते, मात्र ते सगळे पचवून गांधी आज शरीराने गेल्यानंतरही तब्बल ७७ वर्षे हयात आहेत, उलट नव्यानव्या तेजाने उजळून निघत आहेत. ज्यांना ते सहन होत नाही, त्यांना ते समजावेत, उमजावेत व गांधी विचार मानणाऱ्यांनाही ते नव्याने कळावेत यासाठी हे संमेलन आहे.