आंतरराष्ट्रीय लॉबिंगसाठी केंद्राकडून विदेशी सल्लागाराची नियुक्ती; त्वरित खुलासा करावा, आंबेडकरांची मागणी
By राजू इनामदार | Updated: May 5, 2025 16:46 IST2025-05-05T16:45:32+5:302025-05-05T16:46:25+5:30
सल्लागार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटच्या वर्तुळातील आहे, त्याच्या सल्ल्यावरून आता भारताची नीती ठरणार आहे का?

आंतरराष्ट्रीय लॉबिंगसाठी केंद्राकडून विदेशी सल्लागाराची नियुक्ती; त्वरित खुलासा करावा, आंबेडकरांची मागणी
पुणे: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय लॉबिंगसाठी एका परदेशी सल्लागाराची नियुक्ती केली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध वृत्तपत्राचा हवाला दिला. केंद्र सरकारने यावर त्वरित खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.
ॲड. आंबेडकर यांनी सदर व्यक्तीला केंद्र सरकार दीड लाख रुपये वेतन देणार असल्याचे सांगितले. हा सल्लागार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटच्या वर्तुळातील आहे, त्याच्या सल्ल्यावरून आता भारताची नीती ठरणार आहे का? ट्रम्प यांच्या इशाऱ्याने किंवा त्यांची संमती असेल तरच भारत या संदर्भात प्रत्युत्तर देणार आहे का? असे प्रश्न देशाला पडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी करत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, “पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध झाली आहे. तिथे या बातमीचे स्वागतही करण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील जनता संतप्त आहे. भारताने तत्काळ प्रत्युत्तर द्यावे अशी जनतेची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात तिथे काहीही झाले नाही, सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली आहे अशी वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. त्यात आता ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. हा विषय संवेदनशील आहे हे मान्य केले तरी त्यात सत्यता आहे की नाही याचा खुलासा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.