सत्कार दिल्लीत अन् वादाचा धुरळा पुण्यात; शिवसेना-राष्ट्रवादीत ठिणगी, २ माजी नगरसेवकांमध्ये वाकयुद्ध
By राजू इनामदार | Updated: February 13, 2025 16:13 IST2025-02-13T16:11:53+5:302025-02-13T16:13:17+5:30
'राजकारणाचा पोरखेळ, रोखठोक भूमिका' पुण्यात शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटात वादंग उठले

सत्कार दिल्लीत अन् वादाचा धुरळा पुण्यात; शिवसेना-राष्ट्रवादीत ठिणगी, २ माजी नगरसेवकांमध्ये वाकयुद्ध
पुणे : सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा, केला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी, तो झाला दिल्लीत आणि त्यावरून वादंग उठले ते पुण्यात. त्यासाठी निमित्त ठरले आहे ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकेचे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महापालिका समन्वयक वसंत माेरे या दोन माजी नगरसेवकांमध्येच या प्रकरणावरून मोठे वाकयुद्ध जुंपले आहे.
दिल्लीतील त्या सत्कारावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातच वाद सुरू झाले आहेत. शिवसेनेतून फुटल्यामुळे शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांचा राग आहे. त्यांचा सत्कार तर पवार यांनी केलाच, शिवाय गत काही वर्षात नागरी समस्यांची जाणीव असलेले नेते म्हणून त्यांनी शिंदे यांचा गौरवही केला आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरच शब्दांचे बाण सोडले. त्याला प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर देताना २५ वर्षे खासदार असलेल्या राऊत यांना व्यापक दृष्टी मिळाली नाही, ती शरद पवार यांच्याकडे आहे, ते राजकारणाच्या पलीकडे पाहू शकतात, असे म्हटले. त्याचबरोबर राऊत यांनी राजकारणाचा पोरखेळ केला आहे, अशीही टीका केली.
शिवसेनेच्या वसंत मोरे यांनी त्यावर, राजकारणाचा पोरखेळ कोणी केला ते संपूर्ण राज्याला माहिती आहे, असे उत्तर दिले. राऊत यांच्या टिकेला शरद पवार हेच जबाबदार आहेत, असे ते म्हणाले. राऊत नेहमीच त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. महाविकास आघाडीत असताना त्यांनी असे करावे ते काही बरोबर नाही, मात्र वरचे नेते काय ते बघून घेतील, पवार त्यांना काय ते उत्तर देतील. प्रशांत जगताप यांनी त्यावर बोलू नये. यामुळे महाविकास आघाडीत काही फरक पडेल असे वाटत नाही. कारण शरद पवार हे जबाबदार नेते आहेत, ते काही चुकीची भूमिका घेतील असे वाटत नाही, असेही मोरे यांनी सांगितले.