Celebration of Shiv Jayanti in Pune | पुण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुक

पुण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुक

पुणे: 'छत्रपती शिवाजी महाराज की जय,' 'जय भवानी जय शिवाजी' अशा जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात शिवजयंतीनिमित्त पुण्यात मिरवणुक काढण्यात आली. शिवजयंती महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने आयाेजित ही मिरवणुक उत्साहात पार पडली. महापौर मुरलीधर मोहोळ आणि संगीतकार अजय - अतुल यांच्या हस्ते शिवजयंती महोत्सव समितीच्या रथावरील लक्षवेधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लाल महाल जवळून मिरवणुकीला सुरुवात झाली. 

यावेळी  महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, आयोजक अमित गायकवाड तसेच तरुण वर्ग माेठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाला होता. सुरुवातीला शिवगर्जना पथकाच्या ढोल ताशांच्या गजरात लाल महाल परिसर दुमदुमून गेला. पथकाने सुरु केलेल्या तालाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यापाठोपाठ मुलामुलींचे मर्दानी खेळ हे विशेष आकर्षण ठरले. तलवारबाजी, लाठीखेळ, दांडपट्टा , भाला, असे खेळही दाखवण्यात आले. सरसेनापतींच्या मानाच्या पाच रथांनी मिरवणूकीस प्रारंभ झाला. 

स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या रथामध्ये फुलांच्या सजावटीने तिरंगा तयार करण्यात आला होता. त्यापाठोपाठ कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे आदी सरदारांचे रथ होते. सर्वत्र भगवे झेंडे फडकत होते. या सोहळ्यात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या हाेत्या. शिवाजी महाराज, सरदार, मावळे यांच्या वेशभूषेत असणारी लहान मुले व मुली विशेष आकर्षण ठरले.

Web Title: Celebration of Shiv Jayanti in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.