पुणे ते लोणावळा मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 07:33 PM2018-12-27T19:33:26+5:302018-12-27T19:42:52+5:30

या मार्गावर पुण्यासह एकुण १७ स्थानके आहेत. रात्रीच्या वेळी कोणतेही स्थानक सुरक्षित नसते.

CCTV cameras at all railway stations of Pune to Lonavla | पुणे ते लोणावळा मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे 

पुणे ते लोणावळा मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे 

Next
ठळक मुद्दे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निर्णय निर्भया फंडअंतर्गत निधी मिळणार असून मार्चअखेरपर्यंत हे काम होईल पुर्ण रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी परिसरातील अतिक्रमणे काढावीच लागणार

पुणे : मध्य रेल्वेनेपुणे ते लोणावळा मार्गावरील सर्व १४ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी कोणतेही स्थानक सुरक्षित नसते. प्रामुख्याने या स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिली.
पुणे ते लोणावळा स्थानकादरम्यान मध्य रेल्वेकडून दररोज ४४ लोकल गाड्या चालविल्या जातात. लोकलमधून एक लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या मार्गावर पुण्यासह एकुण १७ स्थानके आहेत. त्यापैकी पुणे, शिवाजीनगर व लोणावळा स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षाव्यवस्था तसेच इतर सुविधा चांगल्या आहेत. या मार्गावर खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहू रोड, बेगडेवाडी, गोरवडी, तळेगाव, वडगाव, कान्हे, कामशेत व मळवली ही स्थानके आहेत. तुलनेने या स्थानकांतील प्रवासी संख्या व सुविधाही कमी आहेत. रात्री आठ वाजल्यानंतर बहुतेक स्थानकांवर तुरळक प्रवासी असतात. त्यामुळे महिलांच्या दृष्टीने ही स्थानके सुरक्षित नाहीत. रेल्वे पोलीस दल व महाराष्ट्र रेल्वे पोलीस दलाचे जवान सर्व स्थानकांवर असले तरी काही वेळा अनुचित प्रकार घडतात. सीसीटीव्ही बसविल्यानंतर अशा प्रकारांना आळा घालता येऊ शकेल.
देऊस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठ वाजल्यानंतर कोणतेच स्थानक सुरक्षित नाही. रात्रीच्यावेळी विजेचे दिवे मंद केले जाणे अपेक्षित आहे. पण या स्थानकांवर सर्व दिवे शंभर टक्के सुरू ठेवावे लागतात. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पुणे-लोणावळादरम्यान सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. निर्भया फंडअंतर्गत निधी मिळणार असून मार्चअखेरपर्यंत हे काम पुर्ण होईल. या स्थानकांचा रेल्वे पोलिस दलासोबत सर्व्हेक्षण करून कॅमेरांची संख्या व ठिकाणे निश्चित केली जातील. सर्व कॅमेरांचे नियंत्रण आरपीएफच्या नियंत्रण कक्षात असेल. तिथून प्रत्येक स्थानकांवर घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. 
---------------
अतिक्रमणे काढावीच लागणार
रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी परिसरातील अतिक्रमणे काढावीच लागणार आहेत. पुणे, लोणावळा मार्गावर शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी, चिंचवड, वडगाव, मळवली आदी स्थानकांच्या फलाटांची लांबी कमी आहे. त्यामुळे लोकल गाड्या दोनवेळा एकाच स्थानकांवर थांबवाव्या लागतात. त्यामध्ये खुप वेळ जातो. हे थांबविण्यासाठी फलांची लांबी वाढवावी लागणार आहे. या कामांसाठी काही स्थानक परिसरातील अतिक्रमणे काढावी लागणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Web Title: CCTV cameras at all railway stations of Pune to Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.