प्रगती, सिंहगड, इंद्रायणीमध्येही खानपान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 07:00 IST2019-08-20T07:00:00+5:302019-08-20T07:00:09+5:30
आता प्रगती, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्सप्रेससह लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये खानपानाची सुविधा मिळणार आहे.

प्रगती, सिंहगड, इंद्रायणीमध्येही खानपान
- राजानंद मोरे
पुणे : भारतीय रेल्वेसाठी राणी असलेल्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधील खानपानाची सुविधा प्रवाशांना नेहमीच आकर्षित करते. आता अशीच सुविधा पॅन्ट्री कार नसलेल्या प्रगती, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्सप्रेससह लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये मिळणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) ही सुविधा देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून लवकरच प्रवाशांना गाडीमध्ये खानपानासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
डेक्कन क्वीनमध्ये अनेक वर्षांपासून पॅन्ट्री कार आहे. या गाडीमध्येच खाद्यपदार्थ तयार करून प्रवाशांना मागणीनुसार गरमागरम उपलब्ध करून दिले जातात. तसेच हे पदार्थ खाण्यासाठी स्वतंत्र जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे ही सेवा पुणे-मुंबईदरम्यान या गाडीने प्रवास करणाºया प्रवाशांच्या पसंतीही उतरली आहे. इतर इंटरसिटी तसेच लांबपल्याच्या गाड्यांमध्ये मात्र ही सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. एखादे स्थानक आल्यानंतरच खानपानाची व्यवस्था होते. लांबपल्याच्या अनेक गाड्यांना विविध कारणांमुळे विलंब होतो. काही दिवसांपुर्वी महालक्ष्मी एक्सप्रेस पुराच्या पाण्यात अनेक तास अडकली होती. सह्याद्री एक्सप्रेसच्या प्रवाशांनाही हा अनुभव आला होता. पण गाडीमध्ये खानपानाची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची उपासमार झाली. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचे खुप हाल झाले. हे टाळण्यासाठी रेल्वेने पॅन्ट्री कार नसलेल्या इतर गाड्यांमध्येही ट्रेन साईट वेन्डींग (टीएसव्ही) ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आयआरसीटीसी’मार्फत ठेकेदार नेमून ही यंत्रणा राबविली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई ते दौंड सेक्शनमध्ये धावणाºया पाच इंटरसिटी गाड्यांसह पुणे-इंदौर, जयपुर एक्सप्रेस, उद्यान, अहिंसा, महालक्ष्मी, कोयना, भुसावळ, चेन्नई, सह्याद्री यांसह एकुण ६३ गाड्यांचा सध्या समावेश करण्यात आला आहे. तसेच दौंड-कोल्हापुर सेक्शनमधील काही गाड्याही घेण्यात आल्या आहेत. नाश्त्याबरोबरच शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सुविधाही असेल. पण या गाड्यांमध्ये खाद्यान्न बनविले जाणार नाही. मात्र, संबंधित मार्गावर काही किचन निश्चित केली जातील. तिथून गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ पुरविले जातील. तर गाडीमध्येही या पदार्थांचे वितरण करण्यासाठी विके्रेते ठेवले जातील. या विक्रेत्यांकडे प्रवाशांना पदार्थांची मागणी नोंदविता येईल. या विक्रेत्यांना ड्रेसकोड असेल. तसेच ई-केटरिंगची सुविधा देण्याचाही प्रयत्न आहे. सध्या मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मध्यवर्ती तर पुणे स्थानकावर उप किचनची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
-----------