पुणे: भीमथडी जत्रेत स्टाॅलधारक व्यावसायिक महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ७० हजारांची रोकड, पेनड्राइव्ह चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिंचननगर भागातील मैदानावर भीमथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीचे स्टाॅल जत्रेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला काेथरुड भागातील रामबाग काॅलनीत राहायला आहेत. त्यांचा भीमथडी जत्रेत कपडे विक्रीचा स्टाॅल आहे. शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी स्टाॅलच्या परिसरात गर्दी होती. त्यावेळी त्या ग्राहकांना कपडे दाखवत होत्या. महिलेने रोकड असलेली पिशवी हँगरला लटकवलेल्या कपड्यांमागे ठेवली होती. चोरट्यांनी महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधली. ७० हजारांची रोकड, पेनड्राइव्ह असलेली पिशवी चोरून चोरटे पसार झाले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सविता सपकाळे करत आहेत.
विवाह समारंभात महिलेचे दीड लाखाचे दागिने गेले चोरीस
विवाह समारंभातून ज्येष्ठ महिलेचे दीड लाखाचे दागिने ठेवलेली पिशवी चोरून नेल्याची घटना नगर रस्ता भागातील एका मंगल कार्यालयात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला चंदननगर भागात राहायला आहे. त्यांच्या नात्यातील एकाचा विवाह गेल्या महिन्यात होता. फुलगाव येथील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ महिलेने दीड लाखाचे दागिने असलेली पिशवी मंगल कार्यालयातील खोलीत ठेवली होती. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने दागिने ठेवलेली पिशवी चोरून नेली. विवाह समारंभ पार पडल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विजया वंजारी करत आहेत.