Pune Crime| चिमुकल्याला मारहाण करणाऱ्या म्युझिक टीचरविरुद्ध गुन्हा
By विवेक भुसे | Updated: September 17, 2022 17:33 IST2022-09-17T17:30:36+5:302022-09-17T17:33:33+5:30
लोहगावमधील एका शाळेतील प्रकार...

Pune Crime| चिमुकल्याला मारहाण करणाऱ्या म्युझिक टीचरविरुद्ध गुन्हा
पुणे : वर्गातील मुलांमध्ये झालेल्या भांडणात एका ७ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आपटून दुखापत करण्याचा प्रकार लोहगावमधील एका शाळेत घडला.
याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शाळेतील महिला म्युझिक टीचरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लोहगाव येथील वडगाव शिंदे रोडवरील एका शाळेत १५ सप्टेंबर रोजी घडली.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचा ७ वर्षांचा मुलगा या शाळेत शिकत आहे. त्याची व वर्गातील मुलांमध्ये भांडण झाल्याचे पाहून शाळेतील म्युझिक टीचरने फिर्यादी यांच्या मुलास तोंड जोरात दाबून त्याच्या कानफटात मारल्या, तसेच त्याची डायरी फेकून मारली. उजवा हात पिरगाळले. दोनदा भिंतीवर डोके आपटले. ‘तू हे कोणाला सांगितले, तर तुला क्लासमधून काढून टाकीन’, अशी भीती घातली. या प्रकारामुळे मुलाचे डोके दुखत असून, तो आजारी पडला. त्यानंतर त्याच्या पालकांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निगुडकर तपास करीत आहेत.