हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा; विक्री करणाऱ्यांवर कारवाई होईना, बाजार समितीचेही दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:23 AM2024-04-15T10:23:32+5:302024-04-15T10:23:48+5:30

देवगड हापूसच्या नावे कर्नाटक आंबा विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने त्याला कोण अभय देत आहे, याबाबत बाजारात चर्चा सुरू

Carnatic mango under the name Hapus; No action against the sellers, neglect of the market committee | हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा; विक्री करणाऱ्यांवर कारवाई होईना, बाजार समितीचेही दुर्लक्ष

हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा; विक्री करणाऱ्यांवर कारवाई होईना, बाजार समितीचेही दुर्लक्ष

पुणे: बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फळ बाजारात हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंबा विक्री, पंधरा फुटांपेक्षा जास्तीचा जागा वापर, दुबार विक्री आदी कारवाई संचालक आणि सचिवांच्या आदेशाने थांबविल्याची चर्चा आहे. केवळ एखाद-दुसरी दंडाची पावती करून मर्जीतल्या अडत्यांना मनमानी कारभारात सुट देण्याचे काम फळे आणि भाजीपाला विभागाकडून होत आहे. याकडे बाजार समितीचेही दुर्लक्ष होत आहे.

मार्केटयार्ड फळबाजारात दुबार शेतमाल विक्रीचा बाजार मांडला गेला आहे. बहुतांश अडत्यांनी आपल्या गाळ्यावर आणि गाळ्यासमोरील १५ फुटांच्या जागेवर मदतनीस या नावाखाली डमी विक्रेते ठेवले आहेत. डमी अडते गाळ्यासमोर अस्ताव्यस्त शेतमाल लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. अडत्यांकडून शेतमाल घेऊन किरकोळ स्वरूपात त्याची दुबार विक्री करतात. दुबार शेतमाल विक्रीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

अनेक डमी विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार घडले आहेत. डमी विक्रेते हे बेकायदा असतानाही त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही. अशा डमी अडत्यांकडून एका शेतकऱ्याला मारहाणीचा प्रकार नुकताच समोर आला आहे. तरीही प्रशासनच त्यांना पाठीशी घालत आहे. आता आंबा हंगाम सुरू असून बाजारात अनेक अडते हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंबा विकत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही.

अभय काेण देत?

केवळ साहेबांनी सांगितले म्हणून एखाद दुसरी दंडाची पावती केली जात आहे. यावरून मर्जीतल्या अनेक अडत्यांना मनमानी कारभाराची एक प्रकारे परवानगी दिल्याचे चित्र बाजारात आहे. यामध्ये शेतकरी, ग्राहकांचे नुकसान होत आहे. देवगड हापूसच्या नावे कर्नाटक आंबा विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने त्याला कोण अभय देत आहे, याबाबत बाजारात चर्चा सुरू आहे.

Web Title: Carnatic mango under the name Hapus; No action against the sellers, neglect of the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.