सावधान ! वाहतुक पोलिसांचे ‘टार्गेट ऑरियेंटल’ काम सुरू झालेय..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 06:00 IST2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:09+5:30
आजू-बाजूला कोणी वाहतुक पोलीस नाही म्हणून, ‘नो एन्ट्री’ मधून तुम्ही जात असाल तर सावधान !

सावधान ! वाहतुक पोलिसांचे ‘टार्गेट ऑरियेंटल’ काम सुरू झालेय..
पुणे : आजू-बाजूला कोणी वाहतुक पोलीस नाही म्हणून, ‘नो एन्ट्री’ मधून तुम्ही जात असाल तर सावधान ! कारण आता वाहतुक पोलीस तुम्हाला दंडात्मक कारवाई करून सोडून देणार नाहीत तर, तुमच्यावर थेट खटला दाखल करणार आहेत़. आणि हो, हा खटला असा तसा नव्हे तर तुम्हाला थेट नजिकच्या पोलीस चौकी अथवा स्टेशनमध्ये नेऊन तुमच्यावर भा़द़विक़लम ‘२७९’ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे़. परिणामी चौकीतील पोलीस तुम्हाला प्रारंभी अटक करणार असून, त्यानंतर जामीन झाल्याशिवाय तुमची सुटकाही होणार नाही़.
वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे म्हणून प्रशासकीय पातळीवर विविध प्रयोग राबवून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे़. याचच एक भाग म्हणून की काय, पुणे पोलीस आयुक्तांनी आता वाहन चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेशच दिले आहेत़. याबाबतचे आदेश १२ डिसेंबर,२०१९ रोजी म्हणजेच गुरूवारी जारी करण्यात आले आहेत़. या आदेशात शहरातील सर्व वाहतुक विभाग प्रमुखांना रोज भा़द़विक़लम ‘२७९’ अन्वये कमीत-कमी ५ केसेस (गुन्हे) करण्यात याव्यात व त्याचा अहवाल वाहतुक नियंत्रण कक्ष येथे कळविण्याचे सांगण्यात आले आहे़. धोकादायक स्थितीत वाहन चालविणे अथवा विरूध्द दिशेने वाहन चालवून दुसºयाच्या जिवितास धोका निर्माण होईल, याबाबतचा हा गुन्हा आहे़. हा दखलपात्र गुन्हा असून, यामध्ये जामीन दिल्याशिवाय संबंधिताची सुटका होणार नाही़.
----------
अंमलबजावणी किचकट
शहरातील सर्व वाहतुक विभागांना सदर कारवाईबाबतचे आदेश आल्याने, प्रत्येक विभाग ही कारवाई गुरूवारी रात्रीपासून करीत आहे़. मात्र नो एन्ट्री तून येणाऱ्या वाहनचालकास पोलीस चौकीमध्ये नेल्यावर, त्याच्यावर कलम ‘२७९’ प्रमाणे गुन्हा दाखल करताना मोठी किचकट कार्यवाही पोलीस कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे़. वाहतुक पोलीस नियम मोडणाऱ्या व्यक्तीस पकडून त्यांच्याकडील गाडी ताब्यात घेतात व नंतर संबंधिताला पोलीस चौकीत हजर करतात़. परंतू, येथे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घेऊन, चेहरेपट्टीचे वर्णन आदी कार्यवाही करून त्यांना अटक केली जाते़. यानंतर संबंधित व्यक्तीच्या परिचयातील व्यक्ती आली तर त्यांच्याकडून जामीन घेऊनच त्यांची सुटका होते़ परिणामी या कारवाईचा अतिरिक्त ताण पोलीस चौक्यावर आला आहे़.
वाहतुक नियम मोडल्यावर पूर्वी संबंधितावर दंडात्मक कारवाई होत होती, पण आता ही नुसती उठाठेव पोलीसांच्या मागे लागली आहे़. कारण यामध्ये गुन्ह्याची कागदपत्रे तयार करणे, गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस हवालदाराची नेमणुक करणे, जबाब घेणे, पंचनामा करणे व त्यानंतर हा गुन्हा पोलीस मुख्यालयात, न्यायालयात पाठविवा लागणार आहे़.
-----------------------
वाहतूक पोलिसांनी कलम २७९ कलमाखाली होणाऱ्या वाहतूक नियमभंगाच्या गुन्ह्यांसाठी संबंधित वाहनचालकांवर खटला अवश्य भरावा. परंतू, अशा प्रकारे काही विशिष्ट आकडा देऊन, तितक्या केसेस रोज केल्याच पाहिजेत असे बंधन वाहतूक पोलिसांवर घालणे योग्य नाही. आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी असे केले गेले असल्यास ते चुकीचे आहे. यामुळे केवळ वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आकडे जुळवण्याची कसरत करताना निरपराध वाहनचालकांवर देखील ओढूनताणून खटले भरले जाऊ शकतात. याशिवाय वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष करून केसेस करण्याकडे वाहतूक पोलिसांचा कल राहील. कित्येकदा असेच चित्र रस्त्यावर दिसतेही. पोलीस आयुक्तांचा असा आदेश असल्यास तो नागरिक व वाहतूक पोलीस अधिकारी या दोघांवरही अन्यायकारक आहे व ताबडतोब मागे घेतला गेला पाहिजे. - प्रशांत इनामदार, पादचारी प्रथम स्वयंसेवी संघटना़