भूगर्भातील ‘वॉटर बँक’ संपण्याची काळजी : डॉ. राजेंद्रसिंह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:42 IST2019-12-26T20:38:14+5:302019-12-26T20:42:40+5:30
निसर्ग संवर्धनालाच प्राधान्य देणारी शिक्षणप्रणाली आणली पाहिजे...

भूगर्भातील ‘वॉटर बँक’ संपण्याची काळजी : डॉ. राजेंद्रसिंह
पुणे : ‘भूगर्भातील ७२ टक्के पाणी संपले आहे, देशातील २६५ जिल्हे दुष्काळी झाले आहेत. रिझर्व्ह बँकेतील संचय कमी होत असल्याच्या काळजीपेक्षा भूगर्भातील पाण्याची ‘वॉटर बँक’ संपत असल्याची काळजी करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रगती -विकासासाठी निसर्ग शोषण शिकविणाऱ्या शिक्षण प्रणालीऐवजी निसर्ग संवर्धनावर भर देणारी शिक्षणप्रणाली आणली पाहिजे’, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी आज केले .
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी सकाळी आझम कॅम्पस येथे जलतज्ज्ञ डॉ राजेंद्रसिंह यांच्या हस्ते पार पडला. पंडित वसंत गाडगीळ, डॉ. विवेक सावंत, सरफराज अहमद, जांबुवंत मनोहर, सतीश शिर्के, सतीश खाडे यांना ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. डॉ.अनिता फ्रान्त्झ आणि शबनम शोएब सय्यद यांना ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ पारितोषिक देण्यात आले .
डॉ राजेंद्र सिंह म्हणाले, ‘एकविसावे शतक हे मानवजातीसाठी आव्हानात्मक आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपाने पृथ्वीला ताप आला आहे. दुस-या बाजूला पृथ्वीच्या पोटातील पाणी संपत चालले आहे. त्याचे पुनर्भरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. निसर्गाची साधनसंपत्ती वापरण्याचे शिक्षण दिले जाते. मात्र, निसर्ग संवर्धनाबद्दल शिकवले जात नाही. निसर्ग संवर्धनालाच प्राधान्य देणारी शिक्षणप्रणाली आणली पाहिजे.
सरफराज अहमद, जांबुवंत मनोहर, सतीश खाडे, सतीश शिर्के, डॉ. अनिता फ्रान्त्झ,शबनम सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले. संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. शब्बीर फुलारी यांनी सूत्रसंचालन केले. लतीफ मगदूम यांनी आभार मानले. यावेळी हरीश बुटले, इरफान शेख, संदीप बर्वे, गौरी बीडकर, डॉ. मुश्ताक मुकादम ,डॉ किरण भिसे ,वाहिद बियाबानी,डॉ शैला बुटवाला आदी उपस्थित होते.