पुणे : उन्हाळ्यात चारचाकी वाहनांना आग लागण्याचे व बंद पडण्याच्या घटना जास्त घडतात. यामुळे वाहनांचे मोठे नुकसान तर होतेच शिवाय जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा कार मालकांनो, उन्हाळ्यात थोडे सतर्क राहा. कुलिंग लेव्हल व तापमान याची नियमित तपासणी करा. इंजिन प्रमाणापेक्षा अधिक गरम होत असेल, तर पुढचा धोका ओळखून तत्काळ त्याची दुरुस्ती करा.
उन्हाळ्यात वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात. केवळ ऊन वाढल्याने हे घडत नाही. वाहनाची योग्य काळजी घेतली नसेल अथवा वाहनांत निर्माण झालेला दोष वेळीच दूर झालेला नसेल, तर अशा घटनांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे नियमितपणे इंजिनची देखभाल करणे हेच हिताचे ठरते.
वाहने अचानक का पेटतात :
वाहनातील वायरिंगमध्ये दोष निर्माण झाल्यावर त्यात शॉटसर्किट निर्माण होऊन देखील आग लागते. वाहनातील कुलिंग सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे. इंजिनाचे तापमान ८३ डिग्रीच्या पुढे गेल्यास आग लागण्याचा धोका वाढतो. कुलिंगच्या पाईपमध्ये लिकेज असेल, वॉटर पंप काम करत नसेल, तर वाहने पेटण्याचा धोका अधिक असतो.
वाहने पेटू नये म्हणून :
वाहने पेटू नये म्हणून सर्वांत आधी रेडिएटर फॅन सुस्थितीत आहे का ते पहा, रेडिएटर जाम झाले असल्यास त्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे. एयर फिल्टर, एसी फिल्टर स्वच्छ करून घेणे. टायरमध्ये शक्यतो नायट्रोजन भरून घ्या. त्यामुळे टायर तापत नाही. इंजिन सेन्सर व टेम्परेचर मीटर चांगल्या स्थितीत असल्याचे तपासून घेणे आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गाडीत अग्निशामक यंत्र असणे अत्यंत गरजेचे आहे.
आग लागली तर :
सर्वांत आधी गाडी थांबवून ती रस्त्याच्या कडेला घ्या. तत्काळ इंजिन बंद करणे. गाडीतील अग्निशामक यंत्रणेने आग विझविण्याचा प्रयत्न करणे. वाहनापासून दूर जाणे, पोलीस व अग्निशामक दलाशी संपर्क साधावा.
उन्हाळ्यात गाड्या बंद पडणे व आग लागण्याच्या जास्त घटना घडतात. त्यामुळे कारचालकांनी गाडीतील वायरिंगसह इंजिनांची देखभाल केली पाहिजे. इंजिनचे तापमान गरजेपेक्षा अधिक जास्त वाढता कामा नये.
अमोल गायकवाड, गॅरेज चालक, पुणे.