Pune | डंपरला धडक दिल्याने कारने घेतला पेट; आगाखान पॅलेस समोरील घटना
By विवेक भुसे | Updated: April 19, 2023 15:03 IST2023-04-19T14:59:47+5:302023-04-19T15:03:33+5:30
ही घटना आगाखान पॅलेस समोर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडला...

Pune | डंपरला धडक दिल्याने कारने घेतला पेट; आगाखान पॅलेस समोरील घटना
पुणे : भरधाव जाणाऱ्या आलिशान कारने डंपरला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यात कारने पेट घेतला. एका फायरमनने आपल्या हेल्मेटने गाडीची काच फोडून आतील चालक महिलेला बाहेर काढून तिचा जीव वाचविला. अग्निशामन दलाने तातडीन घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. ही घटना आगाखान पॅलेस समोर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.
याबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, नगर पुणे रोडवर आगाखान पॅलेससमोर एका मालवाहू डंपर पंक्चर झाल्याने उभा होता. नगर रोडने एका आलिशान कारमधून एक महिला भरधाव येत होती. तिने वाटेत एक दोन मोटारसायकलचालकांना धडक दिली. त्यानंतर तिने या डंपरला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी जोरात होती, कारने पेट घेतला. या चालक महिलेला बाहेर पडता येत नव्हते. त्याचवेळी तेथून जाणार्या एका प्रशिक्षित फायरमन जवानाने हेल्मेटने चालकांकडील काच फोडली व या महिलेला बाहेर काढले. त्यावेळी ही महिला जवळपास बेशुद्धावस्थेत होती. तोपर्यंत १०८ रुग्णवाहिका आली. त्यातील डॉक्टरांनी तिला तपासले. तेव्हा तिचा रक्तदाब खाली गेल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले.
इकडे या घटनेच्या समोरच असलेल्या शांतीवन सॉफ्टवेअर हब असलेल्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीची अग्निशमन यंत्रणा वापरुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने वेळेत पोहोचून आग पूर्णपणे विझविली, अशी माहिती अग्निशमन दलाचे कार्यप्रभारी अधिकारी सोपान पवार यांनी दिली. चालक सचिन वाघमारे, फायरमन सचिन जौजळे, संजय कारले, राहुल वडेकर, शरद दराडे आणि अक्षय केदारी यांनी आग विझविली.