राष्ट्रपित्याचा अपमान सहन करू शकत नाही; संभाजी भिडेंच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीची निदर्शने
By राजू हिंगे | Updated: July 31, 2023 18:14 IST2023-07-31T18:14:43+5:302023-07-31T18:14:58+5:30
संभाजी भिडे यांना राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्याची खोड आहे

राष्ट्रपित्याचा अपमान सहन करू शकत नाही; संभाजी भिडेंच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीची निदर्शने
पुणे : मनोहर उर्फ संभाजी भिडे याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, व समाजसुघारक यांच्याबाबतीत केलेल्या गैरवक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने जोरदार निदर्शने करुन निषेध करण्यात आला. भिडे यांना या अवमानकारक वक्तव्याबद्दल अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शहराध्यक्ष दिपक मानकर म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी हे शेवटच्या श्वासापर्यंत या देशासाठी लढले या राष्ट्रपित्याचा अपमान आपण कोणीही सहन करू शकत नाही. संभाजी भिडे याचे खरे नाव मनोहर भिडे. हे असून ही व्यक्ती संभाजी हे नाव लावून जनतेची का फसवणूक करते याचा शोध घेणे निश्चितच गरजेचे आहे. सदर व्यक्तीस त्वरीत अटक व्हावी याकरीता आम्ही शासनाकडे मागणी करीत आहोत. ह्यास त्वरीत अटक न झाल्यास आम्ही सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत.
प्रदिप देशमुख म्हणाले, संभाजी भिडे यांना राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्याची खोड आहे. ही वक्तव्ये जाणिवपूर्वक केली जात असून या माध्यमातून दोन समाजामध्ये दंगली घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य शासनाने याची अतिशय गंभीर अशी दखल घेऊन संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. यावेळी महात्मा गांधी अमर रहे , महात्मा ज्योतीबा फुलेंचा विजय असो या घोषणा देण्यात आल्या.