canditate of bjp in the mayor post race who lost Assembly | विधानसभेची उमेदवारी गमावलेले महापौरपदाच्या शर्यतीत
विधानसभेची उमेदवारी गमावलेले महापौरपदाच्या शर्यतीत

ठळक मुद्देखुल्या आरक्षणामुळे चुरस : कुरघोडीचे राजकारण रंगणारविधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीच पुणे महापालिकेच्या महापौरपदाची मुदत संपली होती

पुणे : राज्यातील महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत बुधवारी पार पडली. पुणे महापालिकेला आलेल्या ‘खुल्या’ आरक्षणामुळे विधानसभेला उमेदवारीने हुलकावणी दिलेल्या नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महापौरपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेक नगरसेवक पुढे आले असले तरी ‘ज्येष्ठता’ हा निकष लावला. 


जाणार आहे. त्यामुळे खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यापैकी कोणता गट बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. 
विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीच पुणे महापालिकेच्या महापौरपदाची मुदत संपली होती. परंतु, राज्य शासनाने त्याला तीन महिने मुदतवाढ दिली होती. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका लागल्या. कोथरूडमधून नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्यासह सुशील मेंगडे यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु, पक्षाने चंद्रकांत पाटील यांनाच कोथरूडमधून उमेदवारी दिल्याने दोघांच्याही मनसुब्यांवर पाणी फेरले गेले होते. त्यातही मोहोळ यांनी जोरदार तयारी केलेली होती. कसबा मतदारसंघामधून नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने हे सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी करीत होते. परंतु, उमेदवारी विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांना देण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी गमावलेले मोहोळ, मेंगडे, घाटे आणि रासने यांनी महापौरपदासाठी तयारी सुरू केली आहे. 
यासोबतच पर्वती मतदारसंघामधून विद्यमान सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनीही उमेदवारी मागितली होती. परंतु, पक्षाने विद्यमान आमदारांनाच पसंती दिली होती. आता भिमाले पालिकेतील कामाचा अनुभव पुढे करून महापौरपदासाठी आग्रही राहतील. यासोबतच नगरसेवक राजेंद्र शिळीमकरही शर्यतीत आहेत. ज्योत्स्ना एकबोटे, वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे या ज्येष्ठ नगरसेविकाही आशा लावून आहेत. परंतु, अडीच वर्षे महिलेकडेच महापौरपद असल्याने यावेळी पुरुष नगरसेवकाचा विचार होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. पक्षाच्या गोटातून मोहोळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. 
............

कुरघोडीचे राजकारण रंगणार
महापालिकेतील महापौरपद बहाल करताना येत्या अडीच वर्षांत पुन्हा लागणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या ‘गणितां’चाही विचार पक्षाला करावा लागणार आहे. यावेळी शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट, संजय काकडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गटांच्या नगरसेवकांमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगणार आहे. काही नगरसेवक तर थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांची मनधरणी करण्याची शक्यता आहे. परंतु, राज्यातील राजकीय पेचप्रसंगामुळे हे नेते पुण्यातील महापौरपदाच्या निवडणुकीत कितपत लक्ष घालू शकतील, हा प्रश्नच आहे.  
........
महापौर बदलानंतर उपमहापौरपदही बदलावे लागणार आहे. परंतु, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयने मात्र उपमहापौरपद आपल्याकडेच हवे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे पद भाजप काढून घेते की आरपीआयकडेच 
ठेवते याकडेही लक्ष लागले आहे. 

Web Title: canditate of bjp in the mayor post race who lost Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.