लोणावळ्यातून व्यावसायिकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 16:11 IST2018-04-14T16:11:05+5:302018-04-14T16:11:05+5:30
एका जागेच्या खरेदीखताकरिता लोणावळ्यात मित्राच्या समवेत आलेले मुंबई येथील व्यावसायिकाचे शुक्रवारी अपहरण झाल्याची घटना घडली आहे.

लोणावळ्यातून व्यावसायिकाचे अपहरण
लोणावळा : एका जागेच्या खरेदीखताकरिता लोणावळ्यात मित्राच्या समवेत आलेले मुंबई येथील व्यापारी दिनेशकुमार रामेश्वर शर्मा (वय ५५ , रा. अंधेरी मुंबई) यांचे शुक्रवारी ( दि. १३ एप्रिल ) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामगुलाम छत्री शर्मा (वय ६२, रा.अंधेरी ईस्ट, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली आहे.
शर्मा यांनी पवनमावळातील मळवंडी ठूले या ठिकाणी एक जागा विकत घेतली होती. त्या जागेचे खरेदीखत करण्याकरिता ते दोघे शुक्रवारी लोणावळ्यात आले होते. त्यांचे लोणावळ्यातील सहकारी रवी पोटफोडे यांच्या तुंगार्ली येथील हॉटेलवर काहीवेळ ते थांबले होते . त्यानंतर चौहान नावाची एक व्यक्ती भेटायला येणार म्हणून दिनेश शर्मा हे रामगुलाम शर्मा यांच्या तुंगार्ली मधील शंकुतला बंगला येथे गेले असता एका गोल्डन रंगाच्या होंडासिटी कार मधून आलेल्या तीन ते चार अनोळखी इसमांनी त्यांना गाडीत बसवून पळवून नेले. रामगुलाम शर्मा यांचा माळी गणेश दळवी व काही रिक्षाचालकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांचा पाठलाग केला मात्र ते मिळून आले नाहीत असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर करत आहेत.