बसचालकानेच चार कर्मचाऱ्यांना जाळून मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:52 IST2025-03-21T12:50:56+5:302025-03-21T12:52:04+5:30
जनार्दन हंबर्डीकर (वय ५७, रा. वारजे) या चालकास पोलिसांनी अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

बसचालकानेच चार कर्मचाऱ्यांना जाळून मारले
हिंजवडी (पुणे) : हिंजवडीतील ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून बुधवारी चौघांचा बळी गेल्याच्या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दिवाळीचा बोनस कापल्याच्या आणि मजुरांचे काम सांगितल्याच्या रागातून चालकानेच बस पेटवून चार कर्मचाऱ्यांना संपविल्याचे गुरुवारी स्पष्ट आले. जनार्दन हंबर्डीकर (वय ५७, रा. वारजे) या चालकास पोलिसांनी अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील टप्पा दोनमधील व्योम ग्राफिक्स (तिरुमाला इंडस्ट्रिअल इस्टेट) कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन बुधवारी सकाळी मिनी बस पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे निघाली होती. सकाळी आठच्या सुमारास चालक हंबर्डीकरच्या पायाखालील बाजूस आग लागली. त्यामुळे चालत्या बसबाहेर उड्या घेतल्याने चालकासह नऊ जण बचावले. मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस बसलेल्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला हाेता.