इंदापूर : तहसील कार्यालयासमोर इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन करुन ती पायदळी तुडवत आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 'इव्हीएम हटावो देश बचाओ'च्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले.इथून पुढच्या निवडणूका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी निवडणूक आयोगाला तसे आदेश द्यावेत अशी मागणी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, ॲड.राहुल 'मखरे, अमोल भिसे, सागर मिसाळ,अक्षय कोकाटे, शाम शिंदे, विकास खिल्लारे, ॲड. आशुतोष भोसले व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.निवेदनात म्हटले आहे की,'नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका हया इव्हीएम मशीनवर झालेल्या आहेत. इव्हीएम मशीनबद्दल महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेमध्ये निवडणूक निकालाविषयी संशयाचे वातावरण तयार झाले आहे. जनतेमध्ये इव्हीएम मशीनविषयी निश्चितच संशय असल्याने त्याची चर्चा चौकाचौकात, गावागावात सुरु आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात येत आहे. ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीने मारक आहे.''खुल्या आणि निपक्ष वातावरणात निवडणूका होणे हे सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने होणे आवश्यक व न्याय आहे. त्यामुळे इथुन पुढच्या सर्व निवडणूका हया बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या ही जनतेची मागणी आहे. तसे न झाल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास राहणार नाही. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. इथून पुढच्या निवडणूका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. यासाठी आपण निवडणूक आयोगास तसे आदेश द्यावेत.'
इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन;राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इव्हीएम मशीन हटाओ आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:10 IST