पुणे: शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, दोन दिवसात कर्वे रस्ता, महम्मद वाडी भागात घरफोडी तर विश्रांतवाडी मध्ये वाईन्स शॉप लुटल्याच्या तीन घटना घडल्या. याप्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध डेक्कन, वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्वे रस्त्यावरील दाणे बंगला कुलूप लावून बंद करण्यात आला होता. अज्ञात चोरट्याने घराचे लोखंडी गज वाकवून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाटात ठेवलेले १३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे हि-याचे दागिने चोरी केले. ही घटना दि. ७ जुलै रोजी रात्री ७. १५ ते ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. एका ८४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सावंत पुढील तपास करीत आहेत. महम्मद वाडी येथील आशीर्वाद पार्क येथे दि. ७ जुलै रोजी सकाळी ९.३० ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान दुसरी घरफोडीची घटना घडली. एका ४६ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादींनुसार, अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप कशाच्या साहाय्याने उचकटून त्याद्वारे आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूमच्या कपाटातील ३ लाख ५० लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. विश्रांतवाडी मध्ये चोरटयांनी वाईन्स शॉप लुटल्याची तिसरी घटना घडली. दि. ८ जुलै रोजी रात्री १०. ते दि. ९ जुलै रोजी सकाळी ९. १५ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी एका ५६ वर्षीय नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे अनुराग कॉम्प्लेक्स मध्ये वाईन शॉप आहे. अज्ञात चोरट्याने वाईन्स शॉप चे लोखंडी शटर तोडून दुकानाच्या ड्रॉवर मधील ६४ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच बॉटल सिल्व्हर कॉईन व इतर साहित्य असा एकूण २ लाख ७९ हजार ८४५रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत.
Pune: शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; कर्वे रस्ता, महम्मद वाडी आणि विश्रांतवाडी भागात ३ घटना
By नम्रता फडणीस | Updated: July 10, 2024 19:03 IST