"Bunty-Babli" honorary positions in the party ... "; BJP corporator's husband openly annoyed on social media | "बंटी-बबली' करणाऱ्यांना पक्षात मानाची पदे..."; भाजप नगरसेविकेच्या पतीची सोशल मीडियावर उघड उघड नाराजी

"बंटी-बबली' करणाऱ्यांना पक्षात मानाची पदे..."; भाजप नगरसेविकेच्या पतीची सोशल मीडियावर उघड उघड नाराजी

विशाल दरगुडे- 

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच दरम्यान प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत पक्षाची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र, दोन्ही महापालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपमध्ये मात्र धुसफूस सुरु आहे. पुणे आणि पिंपरी या दोन्ही ठिकाणी पक्षाचे काही कार्यकर्ते शहरात 'पोस्टरबाजी' किंवा सोशल मीडियावर पोस्ट करून उघड उघड नाराजी व्यक्त करत आहे.

पुण्यातील एका भाजप नगरसेविकेच्या पतीने सुद्धा अशाचप्रकारे सोशल मीडियावर पोस्ट प्रसिद्ध करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून देताना पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. आगामी काळात ही नाराजी भाजपसाठी डोकेदुखी ठरू नये याची काळजी पक्षश्रेष्ठींना नक्कीच घ्यावी लागणार आहे. 

२०१४ साली केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यावर भाजपामध्ये आयाराम यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचप्रमाणे पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत विजयी केले. मात्र २०१९ साली राज्यात सत्तांतर होऊन काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपसमोर दोन्ही महापालिकेतील सत्ता टिकविणे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष  चालणार नाही. 

पालिका व पक्षाची महत्वाची पदे ही आयारामांना दिल्याने पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट टाकून एका पुण्यातील भाजपा नगरसेविकेच्या पतीने पक्षावर नाराजी व्यक्त केली. 2014 सली वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ भाजपचे जगदीश मुळीक हे आमदार म्हणून निवडून आले .त्यानंतर २०१७ साली महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी मिळावी म्हणून इतर पक्षातील अनेक आयारामांना पक्षात घेऊन उमेदवारी देऊन निवडूनही आणले. मात्र या आयारामांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम न करता विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत पक्षाशीच बंटी-बबली खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र २०१९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आयारामांनी पक्षाचे उमेदवाराचे काम न करता विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे काम करून एक प्रकारे मदत केली व भाजपसोबत ‘बंटी-बबली’करत यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्यांनाच महापालिकेतील व पक्षातील महत्त्वाची पदे देऊन आयाराम यांचा जयजयकार केल्याने विमाननगर-सोमनाथनगर प्रभाग क्रमांक तीन मधील भाजप नगरसेवका मुक्ता अर्जुन जगताप यांचे पती अर्जुन जगताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून पक्षावर नाराजी व्यक्त केली. 

या पोस्टमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपने मन की बात सांगताना, “मित्रांनो काहीजण पक्षाशी नाराज, निवडणुकीत (लोकसभा विधानसभा) काही काम न करणारे,पक्षाचे काम न करणाऱ्या किंवा पुढे-पुढे करणाऱ्यांना पक्षाकडून कमिटी किंवा पद मिळाल्याबद्दल अभिनंदन..! वा...वा... खरा पक्ष कार्यकर्ता! अशी आशयाची पोस्ट टाकून अर्जुन जगताप यांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली.


★★★
विधानसभा निवडणुकीत पक्षातील आयाराम पदाधिकारी केवळ शरीराने पक्षात होते .विरोधकांशी हातमिळवणी करत पक्षांशीच गद्दारी केली.आत्ता तर विरोधी पक्षाच्या आमदारांसोबत बिनाधास्त फिरत आहेत. तर काही जण संपर्कात आहेत अशाच पक्षाशी ‘बंटी-बबली’ करणाऱ्यांना कमिटी व पद वाटप केली जात आहेत.त्यामुळे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. पदे देऊनही हे आयाराम येणाऱ्या  पालिका निवडणुकीत पक्षा सोबत राहतील का हा मोठा प्रश्न     आहे . 
-अर्जुन जगताप, नगरसेविका मुक्ता जगताप यांचे पती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: "Bunty-Babli" honorary positions in the party ... "; BJP corporator's husband openly annoyed on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.