प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे रेड्यांना जीवदान; एकावर सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 19:06 IST2017-11-13T18:58:44+5:302017-11-13T19:06:21+5:30
देवीला बळी देण्यासाठी निर्दयपणे बांधून ठेवलेल्या दोन रेड्यांना प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार एकावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे रेड्यांना जीवदान; एकावर सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे : देवीला बळी देण्यासाठी निर्दयपणे बांधून ठेवलेल्या दोन रेड्यांना प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून रेड्यांची सुटका केली आहे. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार एकावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीटर उर्फ संडू चकलेट पवार (वय ४५, रा. शनी मारुती मंदिराजवळ, धनकवडी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. प्राणी जीवसेवा फाउंडेशनचे अमित शहा (रा. आदिनाथ सोसायटी, पुणे) यांना सहकारनगर येथील वनशिव वस्ती येथे फासे पारधी समाजाचे लोक दोन रेड्यांना बळी देण्यासाठी घेऊन आले असल्याची माहिती मिळाली. शहा सुमित तरटे व शामसुंदर आंधळे या इतर दोन प्राणिमित्रांसह तिथे आले. त्यामध्ये देवाचे फोटो होते आणि या तंबूसमोर हळदी कुंकू वाहिलेले आणि गळ्यात हार घातलेले दोन रेडे बांधले होते. हा सर्व प्रकार पाहून रेड्यांचे बळी देणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने कारवाई करीत सदर ठिकाणावरून दोन रेड्यांना मुक्त केले. कोयता, कुर्हाड, दोरखंड, पातेली व बळी देण्यासाठी लागणारे इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. ही सगळी तयारी करीत असलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्याने हे रेडे मेसाई देवीला बळी देण्यात येणार असल्याचे सांगितले. या आरोपीविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंध कायद्यांतर्गत कलम ११ (१) व प्राणी संवर्धन अधिनियमांतर्गत कलम ५,६,७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पवार यास ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरु आहे.