Pune Crime: अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून
By नितीश गोवंडे | Updated: September 2, 2023 15:18 IST2023-09-02T15:16:22+5:302023-09-02T15:18:05+5:30
खुनाच्या घटनांनी शहरात थैमान घातला असून, आपापसातील वादातून सर्वाधिक खून होत आहेत...

Pune Crime: अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून
पुणे : वानवडी परिसरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने हटकल्याच्या कारणावरून एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. महादेव रघुनाथ मोरे (२५, रा. काळेपडळ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणातील पाचही आरोपी हे अल्पवयीन असून, पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खुनाच्या घटनांनी शहरात थैमान घातला असून, आपापसातील वादातून सर्वाधिक खून होत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरातील डोंगरावर असलेल्या मंदिरात ही अल्पवयीन मुले दर्शनासाठी गेली होती. दर्शन करून परतत असताना मोरे हा त्याच्या दुचाकीवर मद्यसेवन करून बसलेला होता. त्याने या मुलांना हटकत शिवीगाळ केल्याने, मुलांनी त्याला दगड मारले. त्यात तो खाली पडून बेशुद्ध झाला. यानंतर घाबरलेल्या मुलांनी त्याला आणखीन मारल्याने त्याचा मृत्यु झाला.
शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.
दरम्यान वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत या गुन्ह्यातील पाचही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शेंडगे पुढील तपास करत आहेत.