Baramati Crime: २३ व्या वर्षी एका उमद्या तरुणाने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना बारामतीमध्ये घडली आहे. रुई बयाजीनगर येथील विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वरवर पाहता हे केवळ प्रेमप्रकरणातून उचललेले पाऊल वाटत असले, तरी विक्रमने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीने खळबळ उडवून दिली. ५ वर्षांच्या प्रेमानंतर मिळालेली लग्नास नकार, प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांकडून सातत्याने केले जाणारे मानसिक खच्चीकरण, सक्तीने डेटा डिलीट करायला लावणे आणि ब्लॅकमेलिंग. या सर्व छळाला कंटाळून विक्रमने आई मला माफ कर म्हणत जगाचा निरोप घेतला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांवर आता गुन्हा दाखल झाला आहे.
लग्नाचे आमिष आणि त्यानंतरचा छळ
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम आणि पुण्यातील खडकवासला येथील तरुणीचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या नात्यात लग्नाची आश्वासने देण्यात आली होती, मात्र अचानक सृष्टीने घरच्यांच्या विरोधाचे कारण पुढे करत लग्नास नकार दिला. इथपर्यंत सर्व ठीक होते, मात्र २७ डिसेंबर २०२५ पासून तरुणी आणि तिची बहिणीने विक्रमला वारंवार फोन करून मानसिक त्रास देण्यास आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आली आहे.
पुण्यात बोलावून धमकी
५ जानेवारी रोजी विक्रमला पुण्यात बोलावून घेण्यात आले होते. तिथे त्याच्यावर दबाव टाकून त्याच्या मोबाईलमधील खाजगी फोटो आणि चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आले. तसेच, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. सृष्टीचे वडील विकास मते यांनीही विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी केल्याचा गंभीर आरोप मृताच्या मामांनी केला आहे.
"मला खूप त्रास दिला जातोय"
१५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ७:४५ च्या सुमारास विक्रमने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या वेदना मांडल्या. "आई मला माफ कर... मला ब्लॅकमेल करून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे," असा उल्लेख त्याने केला.
पोलिस कारवाई आणि गुन्हे दाखल
विक्रमचे मामा सत्यवान आप्पा इंगळे यांच्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सुसाईड नोट आणि विक्रमचा मोबाईल जप्त केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
Web Summary : A 23-year-old in Baramati tragically ended his life, citing blackmail and mental harassment in a suicide note. He blamed his girlfriend and her family from Pune, alleging they pressured him, deleted his data, and issued threats after she refused to marry him after a five-year relationship. Police are investigating.
Web Summary : बारामती में 23 वर्षीय युवक ने आत्महत्या की, सुसाइड नोट में ब्लैकमेल और मानसिक उत्पीड़न का हवाला दिया। उसने पुणे की अपनी गर्लफ्रेंड और उसके परिवार पर दबाव डालने, डेटा हटाने और शादी से इनकार करने के बाद धमकी देने का आरोप लगाया। पुलिस जांच कर रही है।