अवघ्या काही सेकंदात ६०० किलो स्फोटकांनी ढासळणार चांदणी चौकातील पूल

By नितीश गोवंडे | Published: October 1, 2022 02:14 PM2022-10-01T14:14:11+5:302022-10-01T14:18:00+5:30

६०० किलो स्फोटकांच्या वापराने अवघ्या ५ सेकंदांत होणार जमीनदोस्त...

bridge in Chandni Chowk will be demolished with 600 kg explosives in just 5 seconds | अवघ्या काही सेकंदात ६०० किलो स्फोटकांनी ढासळणार चांदणी चौकातील पूल

अवघ्या काही सेकंदात ६०० किलो स्फोटकांनी ढासळणार चांदणी चौकातील पूल

Next

पुणे : मुंबईहून पुण्यात येताना वाहतूक जामसाठी कारणीभूत ठरलेला बहुचर्चित चांदणी चौकातील पूल अखेर आज मध्यरात्री दोन वाजता जमीनदोस्त होणार आहे. कोथरूड डेपोजवळ असलेला या चांदणी चौकातील पूल हा मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आला होता; पण आज वाहनांची संख्या वाढल्याने या परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने प्रशासनाने तो पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रात्री दोन वाजता अवघ्या ५ सेकंदांत हा पूल जमीनदोस्त होणार आहे. त्यासाठी पुलावर १३०० छिद्र करून त्यामध्ये ६०० किलो नायट्रेट स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे.

पूल जमीनदोस्त झाल्यावर राडारोडा, दगड कमी प्रमाणात खाली असलेल्या महामार्गावर पडावी, परिसरात धूळ कमी प्रमाणात पसरावी यासाठी जिओ नामक विशिष्ट पांढऱ्या रंगाचे कापड पुलावर अंथरण्यात आले असून, लोखंडी जाळ्यादेखील लावण्यात आल्या आहेत.

शनिवारी रात्री ११ नंतर पुलाच्या २०० मीटर परिसरात एनएचएआय, पोलीस यांना देखील प्रवेश नसणार आहे. त्याठिकाणी कंत्राट दिलेल्या कंपनीचे फक्त ४ कर्मचारी असणार आहेत. पुणे पोलिसांसह पिंपरी-चिंचवड पोलीस आणि ग्रामीण पोलिसांची देखील वाहतूक नियमनासाठी मदत घेतली जाणार आहे.

रात्री ११ ते सकाळी ८ दरम्यान वाहतूक बंद

पूल पाडताना शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत या परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. छोट्या चारचाकी वाहनांसाठी पोलीस प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली असून ट्रक आणि अन्य जड वाहने पूर्णपणे बंद राहणार आहेत.

Web Title: bridge in Chandni Chowk will be demolished with 600 kg explosives in just 5 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.