कोरोना काळात बंद झालेला पुलोत्सव पुन्हा सुरू होणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 09:48 IST2025-06-04T09:48:09+5:302025-06-04T09:48:18+5:30

जसा उत्तम प्रतिसाद पुणे बालसाहित्य जत्रा आणि पुणे पुस्तक महोत्सवाला मिळाला, तसाच प्रतिसाद पुलोत्सवालाही मिळेल

Bridge festival, which was closed during Corona period will resume Information from Chandrakant Patil | कोरोना काळात बंद झालेला पुलोत्सव पुन्हा सुरू होणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

कोरोना काळात बंद झालेला पुलोत्सव पुन्हा सुरू होणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

पुणे : कोरोना काळात बंद झालेला पुलोत्सव आता पुन्हा सुरू होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, भविष्यात कोणतेही संकट आले तरी हा उपक्रम थांबवू नये. त्याऐवजी ऑनलाइन माध्यमांचा वापर करावा. साहित्य क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या तरुणांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, अशी मागणी आगामी ग्लोबल पुलोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांनी केली.

यावेळी कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.चे सुशील जाधव, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार, लोकमान्य कल्चरल फाउंडेशनच्या आभा औटी, बेलवलकर हाउसिंगचे समीर बेलवलकर, कार्टुनिस्ट कंबाईनचे चारुहास पंडित आदी उपस्थित होते.

साहित्यसम्राट पु. ल. देशपांडे यांच्या अजरामर साहित्यास उजाळा देणारा पुलोत्सव कोरोना काळानंतर यंदा पुन्हा नव्या जोमात आणि व्यापक स्वरूपात साजरा होणार आहे. पु. लं.च्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त तसेच त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा ग्लोबल पुलोत्सव ९ ते १२ जूनदरम्यान बालगंधर्व रंगमंदिर कला दालन व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे होणार आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जसा उत्तम प्रतिसाद पुणे बालसाहित्य जत्रा आणि पुणे पुस्तक महोत्सवाला मिळाला, तसाच प्रतिसाद पुलोत्सवालाही मिळेल, याचा विश्वास आहे. या महोत्सवात पु. लं.च्या साहित्याची स्वतंत्र विक्री दालनात मांडणी व्हावी आणि त्या पुस्तकांवर ५० टक्के सवलत द्यावी. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पु. लं.च्या साहित्याचे आणि व्यंगचित्रांचे प्रदर्शन, पु. लं.ना प्रिय चित्रपटांचे खास सादरीकरण आणि ‘सर्जनशील सहजीवन : पु. लं. आणि सुनीताबाई’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय, पुलोत्सवात जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान, पु. ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ चित्र-नाट्य रंगकर्मी सई परांजपे, विशेष सन्मान दिवंगत गायिका प्रभा अत्रे, पु. ल. कृतज्ञता सन्मान चिंतामणी हसबनीस यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Bridge festival, which was closed during Corona period will resume Information from Chandrakant Patil