Pune Crime | लाचखोर सहायक आयुक्त देसाईची रवानगी पोलिस कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 21:30 IST2023-02-22T21:28:25+5:302023-02-22T21:30:02+5:30
न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत पोलिस कोठडी दिली...

Pune Crime | लाचखोर सहायक आयुक्त देसाईची रवानगी पोलिस कोठडीत
पुणे : लॅक्टोज विक्री परवान्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्तांची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहायक आयुक्त साहेब एकनाथराव देसाई असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत (दि.२३) पोलिस कोठडी दिली आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या कंपनीमार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करून परवाना देण्यासाठी साहेब देसाई यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता देसाई यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देसाई यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस निरीक्षक भारत साळुंखे तपास याचा तपास करत आहेत. दरम्यान, मंगळवारी देसाई यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकिलांनी पोलिस कोठडीची मागणी केली. या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. आरोपीच्या आवाजाचा नमुना घेणे बाकी आहे. अटक आरोपीने लाचेची मागणी कोणासाठी केली आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्रे गोळा करणे, आदी तपासासाठी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.