पुणे : पूर्वीच्या मालकाचे नाव नमुना ८ उताऱ्यावरून काढून टाकून तो उतारा तक्रारदाराच्या नावे करून देण्यासाठी १६ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मौजे वरघड ग्रामंपचायतीच्या महिला सरपंचाच्या पतीला व लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गिवशी आंबेगावच्या सरपंचाला १६ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटच्या समोरच्या बाजूस असलेल्या अतुल्य हॉटेलच्या पार्किंगमध्ये करण्यात आली.
वरघड ग्रामंपचायतीच्या महिला सरपंचाचा पती नथुराम कोंडीबा डोईफोडे (३२, रा. रायकरमळा, धायरी गाव) आणि वेल्हातील गिवशी आंबेगाव या गावचा सरपंच बाळासाहेब धावू मरगळे (३३, किरकटवाडी, हवेली) अशी अटक दोघांची नावे आहेत. तक्रारदार यांनी नुकतीच वेल्ह्यातील वरघड गावात जमीन खरेदी केली होती. जमिनीच्या पूर्वीच्या मालकाचे नावे असलेल्या घराच्या गाव नमुना ८ उताऱ्यावरील पूर्वीच्या मालकाचे नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराने या ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. त्या अनुषंगाने वरघड गावची सरपंच महिला सुवर्णा नथुराम डोईफोडे व त्यांचे पती आरोपी नथुराम हे त्यांना भेटले.
तक्रारदारांच्या कामासाठी व तसा ठराव ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यासाठी महिला सरपंच व तिच्या पतीने तक्रारदारांकडे १८ हजारांची लाचेची मागणी केली. मात्र लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली. त्यानंतर सापळा रचला गेला. त्यामध्ये सरपंचांचा पती नथुराम जाळ्यात अडकला तसेच त्याला प्रोत्साहन देणारा गिवशी गावचा सरपंच बाळासाहेब मरगळे हा देखील गुन्ह्यात निष्पन्न झाल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.