ऊसदराची कोंडी फोडत सोमेश्वर ठरला राज्यात उच्चांकी दर देणारा कारखाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:57 IST2023-08-08T19:57:34+5:302023-08-08T19:57:46+5:30
गत वर्षीच्या उसाला टनाला ३ हजार ३५० रुपये दर देण्याचा अधिकृत निर्णय संचालक मंडळाने घेतला....

ऊसदराची कोंडी फोडत सोमेश्वर ठरला राज्यात उच्चांकी दर देणारा कारखाना
- महेश जगताप
सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्यातील ऊसदराची कोंडी फोडली असून, सन २०२२-२३ या सालात गाळप झालेल्या उसाला तब्बल ३ हजार ३५० रुपये दर जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या ऊसदराची कोंडी फोडत हा दर देणारा सोमेश्वर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरला असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले. आज दि. ८ रोजी संचालक मंडळाची मासिक सभा पार पडली. यामध्ये गत वर्षीच्या उसाला टनाला ३ हजार ३५० रुपये दर देण्याचा अधिकृत निर्णय संचालक मंडळाने घेतला.
अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव तसेच संचालक राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, सुनील भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, आनंदकुमार होळकर, संग्राम सोरटे, ऋषी गायकवाड, जितेंद्र निगडे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे येथे एका सभेत मी नेतृत्व करत असलेल्या कारखान्यात गतवर्षीच्या उसाला ३ हजार ३५० रुपये उसाला दर मिळणार असल्याचे वक्तव्य केले आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या. नक्की माळेगाव की सोमेश्वर कारखान्याच्या सभासदाला हा दर मिळणार? मात्र आज ३ हजार ३५० रुपये दर जाहीर करत सोमेश्वर कारखान्याने यावर पडदा टाकला.
सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षी तुटून गेलेल्या उसाला २ हजार ८४६ रुपये एफआरपी दिली होती. यामध्ये संचालक मंडळाने टनाला ५४ रुपयांची अधिकची भर टाकून सभासदांना २ हजार ९०० रुपये अदा केले होते. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना अजून टनाला ४५० रुपये मिळणार आहेत. मात्र यामधून लवकरच होऊ घातलेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेत सभासदांची परवानगी घेत शिक्षण निधी व परतीची ठेव कपातीची शक्यता नाकारता येत नाही. सोमेश्वर कारखान्याने गेल्या हंगामात १२ लाख ५६ हजार ७६८ मे. टनाचे गाळप केले असून सरासरी ११.९२६ टक्के साखर उतारा राखीत १४ लाख ६७ हजार ९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.