पुणे - दुचाकीवरुन जाणा-या वृद्धाला मारहाण करुन जबरी चोरी करणा-या दोघांना पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत व श्रीगोंदा येथून अटक केली. रामू राजू माने (वय २१, रा. कर्जत, जि़ अहमदनगर) आणि सोमनाथ बाळू खेतमाळीस (२६, रा़ श्रीगोंदा, जि़ अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी भिवाजी बाबूराव साकोरे (७२, रा़ कान्हूरमेसाई) यांनी शिरुर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. साकोरे हे २ जूनला दुचाकीवरुन जात असताना आण्णापूर, येवले माथा येथे मागाहून दोघे जण आले. त्यांनी साकोरे यांच्या दुचाकीला लाथ मारुन त्यांना खाली पाडले. त्यांच्या पाठीत दगड मारुन जखमी केले. त्यांच्या खिशातील १२०० रुपये, बोटामधील अंगठी, मोबाईल जबरदस्तीने काढून घेतली. त्यांना रस्त्याच्या कडेच्या चारीमध्ये ढकलून देऊन त्यांची दुचाकी घेऊन ते पळून गेले होते. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अनेक दिवस या गुन्ह्याचा तपास न लागल्याने त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व त्यांच्या सहका-यांकडून केला जात होता. चोरट्यांच्या वर्णनांवरुन ते नगर, श्रीगोंदा भागातील असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यादृष्टीने तपास सुरु केल्यावर साकोरे यांची चोरुन नेलेली गाडी श्रीगोंदा येथे काही जणांनी पाहिल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरुन शोध सुरु असताना चोरीला गेलेला मोबाईल चोरट्यांनी सुुरु केला. त्यावरुन पोलिसांना रामू आणि सोमनाथ यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी नगर आणि श्रीगोंदा येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोघांनीही गुन्हा कबुल केला. आरोपींचे नातेवाईक शिरुर तालुक्यात राहतात. त्यांच्याकडून परत गावी जात असताना त्यांनी वृद्ध साकोरे यांना पाहून लुटण्याचा बेत आखला होता. त्यांच्याकडून साकोरे यांची दुचाकी, मोबाईल असा ३७ हजार रुपयांचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. अधिक तपासासाठी दोघांना शिरुर पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जबरी चोरी करणा-या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 4:04 PM