'सैराट' झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 21:58 IST2018-03-07T21:58:01+5:302018-03-07T21:58:01+5:30
घरातील चाकू घेऊन ‘मी एकेकाला मारून टाकतो, नाहीतर मीच मरतो’ असे म्हणून चंदन सैरावैरा धावू लागला...

'सैराट' झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला
चाकण : अचानक वेड्यासारखा बडबड करून शिवीगाळ करून हातातील चाकूने खोलीतील मित्रांना दमदाटी करून सैरभैर झालेल्या तरुणाचा नाणेकरवाडीच्या हद्दीत मृतदेह आढळला असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन शिशिर बेहरा ( वय २२, सध्या रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण, मुळगाव नेताजीनगर, थाना तमलूग, जिल्हा पूर्व मिनापूर, पश्चिम बंगाल ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. काल सकाळी साडेसातच्या सुमारास हा मृतदेह चाकण-तळेगाव रोडवर नाणेकरवाडीच्या हद्दीत आराधना स्वीट समोर मिळून आला. याबाबतची फिर्याद सैकत पंकज दास ( वय २४, रा. वसंत भागुजी गवते यांची चाळ, बालाजीनगर, भाग्यांजली बिल्डिंगच्या मागे, मेदनकरवाडी, चाकण ) यांनी दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवार दि. ५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास चंदन हा कामावर जाण्यासाठी तयार होत असताना अचानक आरडा ओरडा करून रूममधील मित्रांना शिवीगाळ व असंबंध बडबड करू लागला. घरातील चाकू घेऊन ‘मी एकेकाला मारून टाकतो, नाहीतर मीच मरतो’ असे म्हणून सैरावैरा धावू लागला. म्हणून त्याच्या मित्रांनी 100 नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिली. थोड्यावेळात पोलीस आले पण अंधारामुळे चंदन पळून गेला. सकाळपर्यंत शोध घेतला असता तो मिळाला नाही. दिनांक ६ मार्च रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास चंदनचा मृतदेह तळेगाव रोडवरील आराधना स्विटसमोर मिळून आला. त्याच्या अंगावर जखमा दिसून येत असल्याने हा अपघात आहे की घातपात की आत्महत्या आहे हे अद्याप समजलेले नाही. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार हे पुढील तपास करीत आहेत.