काळ आला होता पण वेळ आली नव्हती! कात्रज घाटात पडणारी बस झुडपात रुतल्याने वाचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 13:49 IST2023-10-03T13:48:15+5:302023-10-03T13:49:19+5:30
किरकोळ दुखापत वगळता सगळे सुखरूप बसखाली उतरले त्यामुळे ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असाच हा प्रसंग घडला...

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! कात्रज घाटात पडणारी बस झुडपात रुतल्याने वाचली
धनकवडी (पुणे) : पाटणकडून स्वारगेटकडे येणाऱ्या एस.टी.बसचालकाला चक्कर आली. त्यामुळे त्याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून थेट खाली उतरली. गर्द अंधारातून खोल दरीत बस कोसळणार इतक्यात चालकाने प्रसंगावधान राखले, ब्रेक दाबला त्यामुळे बस घाटाजवळील झुडपामध्ये रुतून बसली व मोठा अनर्थ टळला. बसमध्ये तब्बल ४० ते ४५ प्रवासी होते. किरकोळ दुखापत वगळता सगळे सुखरूप बसखाली उतरले त्यामुळे ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असाच हा प्रसंग घडला.
याबाबत माहिती अशी की, पाटण येथून सायंकाळी एस.टी. बस (एमएच ११ बी एल ९३५९) स्वारगेटकडे रवाना झाली होती. रात्री ९.४५ च्या सुमारास कात्रज जुन्या घाटामध्ये बस पोचली. त्याचवेळी बस चालकाला अचानक भोवळ आल्यागत झाले. त्यामुळे काही सेकंदासाठी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि घाटातील एका वळणावरून बस डांबरी रस्त्यावरून खाली उतरली.
काही कळायच्या आत पुढे खोल दरीत बस पडणार इतक्यात चालकाने स्वत:ला सावरले आणि बस दरीत जाऊ नये यासाठी स्टेअरींग जोरात फिरवले व ब्रेकही दाबला. त्यामुळे संरक्षक कठड्याजवळील मोठ्या झुडपात बस रुतून बसली. या अपघातामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना जोरात धक्का बसला. काहीजणांना मुक्कामार, खरचटणे, टेंगूळ अशी किरकोळ दुखापत झाली. सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले. दुसऱ्या बसमधून त्यांना स्वारगेट येथे पाठविण्यात आले.