भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:17 AM2024-03-19T11:17:32+5:302024-03-19T11:18:19+5:30

महाराष्ट्र आणि देशात सुडाचे गलिच्छ राजकारण सुरू असून भाजपकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही

BJP's only target is to defeat Sharad Pawar; Criticism of Supriya Sule | भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका

भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका

बारामती : बारामतीत शेतीमालाला हमीभाव, दुष्काळ, चाराछावणी, टँकर, बेरोजगारीसारखे अनेक महत्वाचे विषय आहेत. मात्र, या विषयांऐवजी केवळ शरद पवार यांना हरविणे हे एकच ‘टार्गेट’ भाजपने ठेवले आहे. हे दुर्दैव आहे. हा महाराष्ट्र छत्रपतींचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. ज्या पद्धतीने त्यांनी संपवून टाकण्याची भाषा वापरली. ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

बारामती येथे रविवारी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचा पराभव आमच्यासाठी जास्त वजनदार आहे, असे वक्तव्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सुळे यांनी हा टोला लगावला. त्या सोमवारी (दि. १८) बारामतीत पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी सुळे म्हणाल्या, काल भाजपच्या मनातील ओठात आले. महाराष्ट्र आणि देशात सुडाचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही, हे काल सिद्ध झाल्याचे सुळे म्हणाल्या.

इंदापूर येथील गोळीबाराच्या घटनेवर देखील सुळे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, बंदूक म्हणजे खेळणे झाले आहे. प्रत्येक नागरिकांची सुरक्षितता ही गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. गाेळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. राज्यात ट्रीपल इंजिन सरकार आल्यापासून ‘क्राइम रेट’ वाढला आहे. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’, हा प्रश्न मनात येतो, असे सुळे म्हणाल्या. इलेक्ट्रोबाँड हा देशातील मोठा भ्रष्टाचार आहे, असा विचार सर्वांच्या मनात येत आहे. याबाबत तातडीने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी देखील सुळे यांनी केली आहे.

त्यांनी सर्वांसमोर मन मोकळे केले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी रविवारी (दि. १७) रात्री काटेवाडी येथे बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली. या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मला तसे वाटत नाही, असे मत व्यक्त केले. काटेवाडी हे ‘श्रीनिवासदादां’चे गाव आहे. ते त्यांच्या मित्रांसमोर बोलत होते. त्यांनी सर्वांसमोर मन मोकळे केले. श्रीनिवासदादा आणि शर्मिलावहिनी माझा प्रत्येक निवडणुकीत प्रचार करतात, असे खासदार सुळे म्हणाल्या.

Web Title: BJP's only target is to defeat Sharad Pawar; Criticism of Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.