प्रारूप प्रभाग रचनेत भाजपचा हस्तक्षेप, शरद पवार गट उच्च न्यायालयात मागणार दाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:26 IST2025-09-03T12:26:05+5:302025-09-03T12:26:30+5:30
सर्वच प्रभागांची तोडफोड करण्यात आल्यामुळे नागरिकांसाठी हे प्रभाग गैरसोयीचे ठरणार आहेत

प्रारूप प्रभाग रचनेत भाजपचा हस्तक्षेप, शरद पवार गट उच्च न्यायालयात मागणार दाद
पुणे: पुणे महापालिकेसाठीची प्रारूप प्रभागरचना करताना नदी, नाले, मुख्य रस्ते आदी नैसर्गिक सीमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सर्वच प्रभागांची तोडफोड करण्यात आल्यामुळे नागरिकांसाठी हे प्रभाग गैरसोयीचे ठरणार आहेत. काही प्रभागात मागासवर्गीय वस्त्यांची जाणीवपूर्वक विभागणी करण्यात आली आहे. ही बाब सामाजिक न्यायाला धक्का पोहोचवणारी आहे. या प्रभाग रचनेत भाजपने पूर्णपणे हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे या विरोधात हरकती नोंदवल्या जात असून उच्च न्यायालयातही दाद मागितली जाणार आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
यावेळी आमदार बापू पठारे, माजी महापौर अंकुश काकडे, गोपाळ तिवारी, माजी आमदार दीप्ती चवधरी, अजित दरेकर, रवींद्र माळवदकर, मेहबूब नदाफ आदी उपस्थित होते. एका प्रभागात ७० हजार तर दुसऱ्या प्रभागात दीड लाख मतदार आहेत. काही प्रभागात चार पोलिस ठाणी आणि चार विधानसभांची हद्द येत आहे. अनेक प्रभागात मागासवर्गीयांवर मोठा अन्याय झाला आहे.
भाजपचे गणेश बीडकर यांनी आपल्या प्रभागात मागासवर्गीय आरक्षण पडू नये, यासाठी निवडणूक आयोगाचे तत्त्व डावलून प्रभागरचनेत मागासवर्गीयांच्या परिसराची तोडफोड केली आहे. विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी निवडून येऊ नयेत, अशी प्रभागरचना भाजपने केली आहे. यात नागरिकांची सोय पाहिलेली नाही, राजकीय भूमिकेतूनच प्रभागरचना केली आहे. आम्ही हरकती नोंदवल्या आहेत. मात्र, प्रशासक व्यवस्थेत आम्हाला न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. शिवणे, उत्तमनगर, वारजेला जोडण्याऐवजी खडकवासल्याला जोडला आहे. हरकती नोंदविण्यासाठी मुद्दाम गणेशोत्सवाचा कालावधी निवडला आहे. अशा प्रभाग रचनेमुळे निवडणुकीनंतर विकासकामांमध्ये अडथळे येणार आहेत. ‘ही प्रभागरचना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून केली गेली आहे. प्रभागरचनेत कोणत्याही बाबतीत समानता नाही. नियमबाह्य प्रभागरचना करणाऱ्यांना जनता उत्तर देईल, असे अरविंद शिंदे आणि प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.
प्रभागाचा आकार झाला वेगवेगळ्या प्राण्यांचे छायाचित्रासारखा
काही प्रभाग चार वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून भाग घेऊन तयार केले गेले आहेत. यामुळे प्रशासकीय सुसूत्रतेचा अभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना आहे की, प्राणी संग्रहालयातील वेगवेगळ्या प्राण्यांचे छायाचित्र? अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली.