BJP will contest all eight seats in Pune: Madhuri Misal | पुण्यातल्या आठही जागा भाजप लढवणार : माधुरी मिसाळ 
पुण्यातल्या आठही जागा भाजप लढवणार : माधुरी मिसाळ 

पुणे : भाजपची महाजनादेश यात्रा पुणे शहराचा टप्पा ओलांडून गेल्यावर शहर संघटनेत चांगलाच आत्मविश्वास जागृत झाला असून शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी विधानसभेच्या सर्व म्हणजेच आठही जागा भाजपच लढवणार असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजपमधील इच्छुक खुश असले तर शिवसेनेत मात्र अस्वस्थता वाढली आहे. 

२०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुका भाजपा आणि शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात लढवल्या होत्या. त्यावेळी आलेल्या निकालात शहरातील सर्व मतदारसंघात भाजपला कौल मिळून आठही ठिकाणी कमळ उमलले होते. त्यामुळे आता विद्यमान आमदार असलेल्या जागा सोडणार नाही असा पवित्रा स्थानिक नेत्यांनी घेतला आहे तर २००९प्रमाणे जागावाटप व्हावे अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्यामुळे आता पुण्याच्या जागांवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

याबाबत मिसाळ म्हणाल्या की, 'आम्ही आठही विधानसभा लढवणार आहोत,कारण सर्व ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत. भाजपने निवडणूक लढवण्याकरिता लागणारी तयारी सुरु केली असूनसंयोजक, प्रभारी यांच्या नेमणुका झाल्या आहेत. येणाऱ्या काळात लागणारे दौरे, सभा यांची तयारी पूर्ण झाली असून त्या नियोजनकरिता वॉर रूम सज्ज आहे. बूथ उभारणीही झाली असून आम्ही  आठही मतदारसंघ लढण्यासज्ज आहोत. दुसरीकडे शिवसेनेचे महापालिका गटनेते संजय भोसले यांनी मात्र लोकसभेच्या निकालांमुळे भाजप हवेत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, 'भाजपने लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांचे काम करून घेतले. आता सन्मानाने युती होणे गरजेचे आहे. आठ काय आमची २८८ जागांवर लढण्याची तयारी असून पक्षप्रमुख घेतील तो निर्णय मान्य राहील. मात्र पुण्यातले सेनेचे तीन जुने मतदारसंघ परत मिळायला हवेत'. 

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे बोलले जात असताना पुण्यात मात्र जागांवरून संघर्ष उभा राहू शकतो. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या मनाप्रमाणे जागांचे वाटप होणार की वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे स्थानिकांना लढावे लागणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. 


Web Title: BJP will contest all eight seats in Pune: Madhuri Misal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.