सैन्यदलाच्या कर्तृत्वावर सत्ताधाऱ्यांचा पाेळी भाजून घेण्याचा प्रयत्न : आनंदराज आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 19:45 IST2019-03-02T19:36:18+5:302019-03-02T19:45:01+5:30
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

सैन्यदलाच्या कर्तृत्वावर सत्ताधाऱ्यांचा पाेळी भाजून घेण्याचा प्रयत्न : आनंदराज आंबेडकर
पुणे : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली याचा आनंद असला तरी या सुटकेचे राजकारण केले गेले याचा खेद वाटतो. पाकिस्तानच्या कुरापतींना चोख उत्तर देणाऱ्या सैन्यदलाच्या कर्तृत्वावर आपली पोळी भाजून घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे, अशा शब्दातं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
यवतमाळ येथे प्रचार सभेत असलेल्या पंतप्रधानांनी जवळच असलेल्या बुलडाणा येथील शहीद जवानांच्या अंत्ययात्रेला उपस्थित रहायला हवे होते. मात्र, ही असंवेदना दाखविणारे पंतप्रधान केवळ ‘मन की बात’ ऐकविण्यातच मश्गुल आहेत. आता निवडणुकीमध्ये जनता त्यांना ‘जन की बात’दाखवून देईल, असा इशारा आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना
चांगला प्रतिसाद मिळत असून राजकारणातील ही पोकळी आघाडी भरून काढेल, असा विश्वास व्यक्त करीत प्रस्थापित नेत्यांविरूद्ध महाराष्ट्रातील जनता मतदान करेल. आंबेडकरी चळवळ मजबूत व्हावी या उद्देशातून रिपब्लिकन सेनेने वंचित बहुजन आघाडीकडे जागांची मागणी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोदी लाट ओसरली असून ‘एकला चलो रे’ ही परिस्थिती राहिली नसल्याने भाजपला नाकदुऱ्या काढून शिवसेनेला बरोबर घेणे भाग पडले आहे. या दोन पक्षांची युती झाली असली तरी एकी झाली नसल्यामुळे परस्परांचे उमेदवार पाडण्याचेच काम केले जाईल, याकडे आंबेडकर यांनी लक्ष्य वेधले.