BJP to help for relative, who died in Accident in Pune | वारकरी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना भाजपातर्फे ५ लाखांची मदत
वारकरी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना भाजपातर्फे ५ लाखांची मदत

पुणे - पुण्याजवळ दिवे घाटात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वारकऱ्यांच्या वारसांना भारतीय जनता पार्टी आपल्या आपदा ट्रस्टमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करेल तसेच गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या शस्त्रक्रियेसह सर्व उपचारांचा खर्च भाजपातर्फे करण्यात येईल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जाहीर केले.

चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी वारीतील अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांची पुण्यातील हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केली. संत नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना भाजपातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
त्याचसोबत या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियेचा आणि रुग्णालयातून घरी गेल्यानंतर होणारा औषध उपचारांचा खर्च भाजपातर्फे करण्यात येईल, असंही भाजपा प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले. 

पंढरपूर ते आळंदी वारी करणाऱ्या दिंडीला सासवड जवळील दिवे घाटात अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 2 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर हडपसर येथील नोबेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी (19 नोव्हेंबर) सकाळी 8.30 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली. सोपान महाराज नामदास (वय 36) आणि अतुल महाराज आळशी (वय 24) अशी मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. यातील सोपान महाराज नामदास हे संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संत नामदेव पालखी सोहळ्याची दिंडी प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूर ते आळंदी प्रवास करत होती. यावेळी आळंदीकडे येत असताना दिवे घाटात हा अपघात झाला. घाटात दिंडी उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जेसीबीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि जेसीबी थेट दिंडीत घुसला. काही क्षणात आरडाओरडा झाला मात्र या सुन्न करणाऱ्या अपघातात दोन वारकऱ्यांना नाहक जीव गमवावा लागला. मात्र या अपघातानंतर पुन्हा वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
 

Web Title: BJP to help for relative, who died in Accident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.