पुण्यात भाजपचे उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 13:04 IST2023-02-05T13:04:41+5:302023-02-05T13:04:49+5:30
भाजपच्या वतीने अश्विनी जगताप व हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर

पुण्यात भाजपचे उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार?
पुणे : विधानसभेच्या चिंचवड व कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनुक्रमे अश्विनी जगताप व हेमंत रासने यांची उमेदवारी शनिवारी दुपारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीचे दोन्ही जागांसाठीचे उमेदवार रविवारी (दि. ५) जाहीर केले जातील. २६ फेब्रुवारीला या दोन्ही मतदारसंघांत मतदान होणार आहे.
दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे तिथे पोटनिवडणूक होत आहे. चिंचवडमध्ये भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, कसब्यात मात्र मुक्ता टिळक यांचे पती शैलेश व मुलगा कुणाल यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे शैलेश यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी रात्री त्यांची भेट घेतली. शुक्रवारी रात्री (दि. ४) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची भेट घेतली होती.
महाविकास आघाडी रविवारी उमेदवार जाहीर करतील असे सांगण्यात आले. त्यांच्यात कसब्यासाठी रवींद्र धंगेकर (काँग्रेस) व चिंचवडसाठी राहुल कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या नावाची चर्चा आहे. आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप अधिकृतपणे भूमिका जाहीर केलेली नाही.