मोठी बातमी! जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार अखेर रद्द, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:19 IST2025-10-30T15:19:12+5:302025-10-30T15:19:43+5:30
जैन बांधवांनी या व्यवहारात आधी आणि आताही कुठंही माझं नाव घेतलं नव्हतं

मोठी बातमी! जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार अखेर रद्द, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे : जैन बोर्डिंग प्रकरणातील जमिनीचा व्यवहार रद्द झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तो व्यवहार रद्द होणे अत्यंत गरजेचं होत असे म्हणत त्यांनी जैन बांधवांचे आभार मानले.
जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या वादाच्या प्रकरणाची सुनावणी आज मुंबईच्या धर्मादाय आयुक्तालयात पार पडली. या सुनावणीत सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि गोखले बिल्डर या दोन्ही पक्षांकडून प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार असून, त्यानंतर धर्मादाय आयुक्त यावर निर्णय देणार असल्याने जैन समाजाचे या प्रकरणाकडे लक्ष लागले होते. अखेर धर्मादाय आयुक्तालयाकडून हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे.
जैन समाजाच्या तीव्र विरोधानंतर बिल्डर विशाल गोखले यांनी या प्रकल्पातून माघार घेण्याची घोषणा केली होती. धार्मिक भावनांचा आदर राखत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, जोपर्यंत हा करार अधिकृतपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका जैन समाजाने घेतली आहे. सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यामध्ये हा व्यवहार झाला असला तरी या प्रकरणाशी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव जोडण्यात आले. त्यावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या वादात उडी घेतली होती. मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसमध्ये जाऊन जैन बांधवांशी संवाद साधला आणि जैन समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.
जैन बांधवांनी या व्यवहारात माझं नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
व्यवहारात मी जो शब्द दिला होता तो पाळला आहे. त्यांच्या विनंतीवरून मी या प्रकरणात उतरलो होतो. त्यांचं सर्व काही म्हणणंही मी ऐकून घेतलं होतं. तसेच समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिलं होत. अखेर धर्मादाय आयुक्तांनी त्यांना न्याय मिळवून दिला. आणि आजच्या सुनावणीत हा जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करण्यात आला आहे. जैन बांधवांनी या व्यवहारात आधी कुठंही माझं नाव घेतलं नाही. त्यानंतर सुनावणीतही माझं काहीच नाव घेण्यात आलं नाही. तरीही माझ्यावर आरोप - प्रत्यारोप झाले. आता पुढे मी एकदा या व्यवहाराशी निगडित लोकांशी संवाद साधणार आहे. जैन बांधवांना न्याय मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.