ऑपरेशन टायगरला सुरुवात? पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार महादेव बाबर शिंदेसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 23:43 IST2025-01-30T23:40:37+5:302025-01-30T23:43:39+5:30
Mahadev Babar To Join Shiv Sena Shinde Group: विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर नाराज होते. पुणे शहरातील आणखी काही नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ऑपरेशन टायगरला सुरुवात? पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार महादेव बाबर शिंदेसेनेत
Mahadev Babar To Join Shiv Sena Shinde Group: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसताना पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक, माजी आमदार ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटाची वाट धरत आहेत. अलीकडेच खासदार संजय राऊत यांचा पुणे दौरा झाला. यानंतर ठाकरे गटातील ४०० ते ५०० कार्यकर्ते शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुखांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरशिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
ठाकरे गटाच्या ४, काँग्रेसच्या ५ आमदारांनी व ठाकरे गटाच्या ३ खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. याचबरोबर ठाकरे गटाचे १० माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि येत्या काही दिवसांतच हे सगळे शिवसेनेत सामील होतील, असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी केला होता. तसेच माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला होता. याशिवाय संजय शिरसाट यांनीही याबाबत स्पष्ट शब्दांत सूतोवाच केले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे.
महादेव बाबर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
पुण्यातील ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते. महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे बाबर नाराज होते, अशी माहिती मिळाली आहे.
शिवसेनेचे काम इथून पुढे करणार नाही, आघाडीबरोबर राहणार नाही
पुण्याच्या हडपसर विधानसभेत महाविकास आघाडी कडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून महादेव बाबर इच्छुक होते. हडपसरची जागा शरद पवार गटाकडे गेल्याने महादेव बाबर यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेचे काम इथून पुढे करणार नाही. तसेच आघाडीबरोबरही राहणार नाही, अशी ठाम भूमिका महादेव बाबर यांनी घेतली होती. तसेच पुणे जिल्ह्यातील २१ जागांवर एकही उमेदवार दिलेला नाही. पक्षप्रमुखांना आमचा विचार करायचा नसेल. आम्ही मातोश्रीला साहेबांना भेटायला गेल्यावर सकाळी ११ ते ५ बसून होतो. उद्धव साहेब आले ४० सेकंद आम्हाला भेटले आणि निघून गेले. माझा पुढचा निर्णय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना विचारून घेणार, असे निर्धार महादेव बाबर यांनी केला होता. यानंतर आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय नक्की केला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर सांगली तसेच जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. आतापर्यंत उद्धवसेनेचे ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेने पक्षबांधणी सुरू केली आहे. जे तगडे नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत, त्यांच्या जागी आता तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराचा उद्धवसेनेला शोध घ्यावा लागणार आहे.