पुण्यात शिंदे गटाला मोठा धक्का; एकाच वेळी २०० कार्यकर्त्यांचा धंगेकरांकडे सामूहिक राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:54 IST2025-12-20T16:53:47+5:302025-12-20T16:54:33+5:30
आम्हाला फक्त ८ ते १० जागा मिळणार असल्याचं समजत आहे. आमच्या नेत्यांवर भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.

पुण्यात शिंदे गटाला मोठा धक्का; एकाच वेळी २०० कार्यकर्त्यांचा धंगेकरांकडे सामूहिक राजीनामा
पुणे : पुण्यात महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून निवडणुकीसाठी मुलाखती घेणं सुरु आहे. भाजपकडे मुलाखती देणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच असंख्य माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश घेऊ लागले आहेत. पुण्यात अनेक भागात महायुतीची ताकद वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. एकाच वेळी शिवसेना शिंदे गटाच्या २०० कार्यकर्त्यांनी पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांच्याकडे राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
माथाडी कामगार सेना आणि शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख निलेश माझिरे यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या २०० पदाधिकाऱ्यांसोबत रवींद्र धंगेकर यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. आमच्या शहर अध्यक्षांनी आणि नेत्यांनी आमची फसवणूक केली आहे. आम्हाला फक्त ८ ते १० जागा मिळणार असल्याचं समजत आहे. आमच्या नेत्यांवर भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. एकाचवेळी शिवसेना शिंदे गटाच्या २०० कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने एकनाथ शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेंकर यांच्याकडून या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.