Pune | मोक्कातील पलायन केलेल्या आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 20:50 IST2023-02-07T20:48:11+5:302023-02-07T20:50:01+5:30
हवेली पोलीस ठाण्यात चौघांवर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल...

Pune | मोक्कातील पलायन केलेल्या आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
बिबवेवाडी (पुणे) : मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी तपासादरम्यान मार्केट यार्ड पोलिसांवर हल्ला करुन पसार झाल्याची घटना बुधवारी (दि.१ फेब्रुवारी) सायंकाळी खानापूर येथे घडली होती. या आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी भिगवण येते तब्बल एक किलोमीटर पाठलाग करुन पकडले. याप्रकरणी आरोपी पळून गेल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात चौघांवर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बाळू पवार (वय २६ वर्षे, राहणार. पानशेत रोड, खानापूर, ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मार्केटयार्ड परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून पंचवीस लाख रुपयांचा दरोडा अविनाश रामप्रताप गुप्ता व त्याच्या टोळीने टाकला होता. पोलिसांनी या टोळीला पकडल्यानंतर मोक्का लावण्यात आला होता. दरम्यान गुन्हयाचा तपास करण्यासाठी संतोष पवार आणि आणखी एका गुन्हेगारास खानापूर येथे नेले होते.
संतोष पवार याच्या घरी तपास सुरु असताना तीघेजण तीथे दाखल झाले. तेथे संतोष पवार याने अचानक हातातील बेडीला झटका मारुन पोलीस कर्मचाऱ्याच्यां पासून सुटका करुन घेतली. तो पळत असताना त्याच्या मागे आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर बेडीने हल्ला चढवला. यानंतर दुचाकीवर बसून पळून जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी पकडली असता, त्याला काही अंतरावर फरफटत नेले. यानंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते सापडू शकले नाही.
दरम्यान आरोपीचा शोध हवेली पोलीस आणि मार्केटयार्ड पोलीस करत होते. मार्केटयार्ड पोलिसांना तांत्रीक विश्लेषणात तो भिगवण येथे असल्याची माहिती मिळाली. मात्र पथक भिगवणला जाईपर्यंत आरोपीने त्याची जागा बदलली असती. दरम्यान बिबवेवाडी पोलिसांचे एक पथक त्यांच्या कडे दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपीला शोधण्यासाठी भिगवणला होते. मार्केटयार्ड पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानूसार बिबवेवाडी पोलिसांचे पथक संतोष पवारच्या मागावर केले. पोलिसांना बघून संतोष पवारने पळ काढला. तपास पथकाने तब्बल एक किलोमीटर पाठलाग करुन त्याला जेरबंद केले.